‘पहाटे शपथविधी’ वर देवेंद्र फडणवीस लिहिणार पुस्तक | पुढारी

'पहाटे शपथविधी' वर देवेंद्र फडणवीस लिहिणार पुस्तक

मुंबई, पुढारी ऑनलाईन

शिवसेनेने आम्हाला धोका दिला त्यामुळे आम्ही अजित पवार यांना सोबत घेऊन पहाटे शपथविधी केला. मात्र, हे झालं नसतं तर चांगलं झालं असतं. आता यावर एक पुस्तक लिहिणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते एका वेबसाईटशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर ते एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर त्यांनी टीका केली.
ते म्हणाले, ‘शिवसेनेने निवडणुकीत आमच्याशी युती केली. पण निवडणुकीनंतर विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांना सोबत घेतले. आणि पहाटे शपथविधी करून सरकार स्थापन केले. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता, त्याचा राग होता.’

पहाटे शपथविधी  केला ते चुकलेच :फडणवीस

ते पुढे म्हणाले, ‘शिवसेनेने आमची साथ सोडल्याने आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा विचार केला. मात्र, ते आमचे चुकलेच. याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगले झाले असते. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होते आणि कोणी काय केले होते. या सर्व घटनाक्रमावर पुस्तक लिहिणार असून त्यातून अनेक गोष्टींचा उलघडा होईल.’

सरकारवर टीका

कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ‘राज्य सरकारने १० हजार मृत्यू लपवले. सरकारने करोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचं सांगत आपली पाठ थोपटून घेतली आहे. मात्र देशातील एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. ते सरकार स्वीकारत नाही.’

सरकार लवकर कोसळेल

सरकार कोसळणार याच्या अनेक तारखा दिल्या. मात्र, सरकार कोसळले नाही, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, सरकार स्थिर आणि मजबूत आहे असे सांगितले जाते. मात्र, ते जेवढे मजबूत आहे तेवढे अस्थिर. ते आपल्या वजनाने खाली येईल, असे ते म्हणाले.

मलिकांची टीका

‘फडणविसांना सत्तेशिवाय राहताच येत नाही हेच त्यांनीदोन वर्षांपूर्वी सिद्ध केले. आगदी काहीदिवसांपूर्वीपर्यंत आपण मुख्यमंत्री नाही आहोत यावर अद्याप विश्वासच बसत नाही’ असे म्हटले होते. आता त्यांनी वास्तव स्विकारलेले दिसते आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपातील फडणवीसांच्या विरोधकांना बढती मिळाली आहे. तावडेंना आता थेट पंतप्रधानांशी बोलता येणार आहे. यावरून फडणवीसांची पक्षातील किंमत कमी होत आहे, असेही मलिक म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button