Lok Sabha Election 2024 : सातारा मतदारसंघातून अतुल भोसलेंनी खासदार व्हावं : जयकुमार गोरे | पुढारी

Lok Sabha Election 2024 : सातारा मतदारसंघातून अतुल भोसलेंनी खासदार व्हावं : जयकुमार गोरे

कराड; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप अथवा महायुतीतील अजित पवार गटाच्या वाट्याला जाणार याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. या लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी कराड तालुक्यातील वाठारमधील एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे उमेदवारीवरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

कराड दक्षिण मधील भाजपाचे नेते व सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार व्हावं ही आम्हा सर्वांची भावना आहे. मात्र ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी अनेकांना संधी दिली, असे म्हणत आता विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या अतुल भोसले यांना संधी द्या. खरंतर अतुल भोसले यांनी खासदार व्हावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. मी उमेदवारी देणारा अथवा उमेदवारी जाहीर करणारा पदाधिकारी नाही. ते अधिकार दिल्लीत वरिष्ठांना आहेत. मात्र अतुल भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास होकार दिल्यास काहीच अडचण येणार नाही, असे जाहीर वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी वाठार येथील जाहीर सभेत केले.

आमदार जयकुमार गोरे यांच्या या वक्तव्यानंतर सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असणार? वरिष्ठ नेत्यांचं जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भावना लक्षात घेत लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत इच्छुक नसणारे डॉक्टर अतुल भोसले लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास होकार देणार का? अशा अनेक चर्चा आता यामुळे सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button