उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात भाजपकडून गुन्हेगार घडविण्याचे काम होत असून, भाजपचे आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतात, हे धाडस येते कोठून? त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांवरही आरोप होत असतील तर हे योग्य आहे का? महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेने निघाला आहे? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्र सांभाळता येत नाही, अशी जळजळीत टीका केली.
उंब्रज (ता. कराड) येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, सौ.संगिता साळुंखे, माजी जि.प. सदस्य जयवंतराव जाधव, बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव, ग्रा. पं. सदस्य सुधाकर जाधव, अॅड. प्रमोद पुजारी, पै. अजित जाधव, डी. बी. जाधव, जयंतराव जाधव उपस्थित होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, भाजपची 'शासन आपल्या दारी' ही योजना जनतेची निव्वळ फसवणूक करणारी व भाजपचा इव्हेंट करणारी आहे. हा उपक्रम राबवायचा असेल तर तहसीलदारांनी सर्वसामान्यांच्या दारात जाऊन योजना राबविणे गरजेचे आहे. तसेच राजकारण हे विचारांचे असते, विचारांना छेद देऊन आपली तत्वे सोडून राजकारणाची दिशा बदलायची नसते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागा व खा. शरद पवार यांच्या पाठीशी एकसंघपणे रहा, पक्षाला ताकद देण्याचे काम जनतेने एकसंघपणे करावे.
आ. बाळासाहेब म्हणाले, राज्यातील राजकारण हे द्वेषावर आधारित आहे. भाजपने पक्ष फोडण्याची भूमिका घेतली आहे. तसेच कालच्या घटनेने गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र बिहारच्या पुढे जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त करून, प्रशासनाचा अंकुश राहिला नसल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असो खा. शरद पवार ज्यांच्या पाठीमागे आहेत त्यांचा विजय निश्चित आहे. तसेच विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चौकशी व कारवाईचे षडयंत्र आखले जात आहे. देशात प्रचंड दडपशाही व हुकूमशाही सुरू असून, 2024 नंतर देशात लोकशाही राहील का ? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी मेहबूब शेख, सारंग पाटील, सौ. संगिता साळुंखे, सुनिल माने, देवराज पाटील, जयंतराव जाधव, जयवंत साळुंखे आदीनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड उत्तर व दक्षिण मधील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष देवराज पाटील यांनी केले. डी. बी. जाधव यांनी आभार मानले.