मराठा आरक्षण नाही तर जिलेबीही नाही; सातार्‍यात प्रजासत्ताक दिनी विक्रेत्यांचा निर्णय | पुढारी

मराठा आरक्षण नाही तर जिलेबीही नाही; सातार्‍यात प्रजासत्ताक दिनी विक्रेत्यांचा निर्णय

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाज हा मिठाई खरेदी करणारा मोठा ग्राहकवर्ग आहे. आज आरक्षणासाठी या समाजाला संघर्ष करावा लागत आहे. या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी 26 जानेवारीला मावा जिलेबीचे उत्पादन व विक्री करणार नाही, असा निर्णय सातार्‍यातील सुप्रसिध्द मिठाई विक्रेते प्रशांत मोदी (लाटकर) यांनी घेतला आहे.

मोदीज नारायण पेढेवाले प्रशांत मोदी यांची मराठा आरक्षणाबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले आहे, सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे सातारकरांचे जिव्हाळ्याचे कार्यक्रम आहेत. या दोन्ही दिवशी सातारकर एकमेकांना जिलेबी भरवून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतात. सातार्‍याची तशी परंपराच आहे. सुप्रसिध्द मिठाई विक्रेते मोदी यांची मावा जिलेबी सातारकरांची विशेष आवडती जिलेबी आहे. मात्र यावर्षी या जिलेबीचे उत्पादन व विक्री न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हेच नैतिकतेला धरुन आहे असे वाटते. ग्राहकांच्या होणार्‍या गैरसोईबद्दल दिलगीर आहोत. मराठा आरक्षण आंदोलकांना पूर्णत: जाहीर पाठिंबा असल्याचेही प्रशांत मोदी यांनी पोस्टच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

Back to top button