सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव | पुढारी

सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव

सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी धोम, धोम-बकलवडी, उरमोडी तसेच कण्हेर या प्रमुख धरणांतील ठराविक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पिण्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याची माहिती मागवली असून दोन दिवसांत होणार्‍या कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पावसाळा संपत आला असताना प्रमुख धरणे अद्याप रिती आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तलाव कोरडे ठाक पडले आहेत. माण, खटाव, फलटण या तालुक्यात बर्‍याच ठिकाणी पिण्यासाठीही लोकांना वणवण भटाकावे लागत आहे. पावासाचे हुकमी दोन महिने संपल्याने राहिलेल्या उर्वरित दोन महिन्यांत तरी पाऊस पडेल याची चिंता भेडसावत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने भविष्यातील टंचाई निवारणाच्या कामात यंत्रणा गुंतली आहे.

सगळी भिस्त मान्सून माघारीवर असली तरी ऐनवेळी लोकांचे हाल होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणजे राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील कोयना धरण वगळता उर्वरित चार धरणांतील काही पाणीसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यावर बहुतेक पहिल्यांदाच ही वेळ आली आहे. धोम, धोम-बलकवडी, उरमोडी तसेच कण्हेर धरणातील पाणी पिण्यासाठी जून 2024 पर्यंत राखीव ठेवले जाणार आहे. मात्र या धरणातील किती टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवायचा याचा निर्णय सातारा व सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या कालवा सल्लागार समितीमध्ये होणार आहे.

पाणी नियोजनाचा अहवाल मागवला…

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत क्षेत्रात वर्षभर पिण्यासाठी किती टीएमसी पाण्याचा वापर होतो. या यंत्रणांना किती टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे करणार, लोकांना व जनावरांना किती पाणी लागणार अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्याचा अहवाल या यंत्रणांकडून मागवला आहे.

Back to top button