हे चंद्रावरील खड्डे नाहीत बरं का..! जगप्रसिद्ध महाबळेश्वर खड्ड्यांनी वेढले | पुढारी

हे चंद्रावरील खड्डे नाहीत बरं का..! जगप्रसिद्ध महाबळेश्वर खड्ड्यांनी वेढले

प्रेषित गांधी

महाबळेश्वर : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर सध्या वर्षा पर्यटकांनी गजबजले असून, या निसर्गरम्य पर्यटनस्थळाचा प्रवास पर्यटकांसह स्थानिकांनाही धक्के खात करावा लागत आहे. केवळ राज्यपाल व मुख्यमंत्री दौर्‍यावेळी तात्पुरती मलमपट्टी करून खड्डेमुक्त करण्यात आलेल्या या पर्यटनस्थळाकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्ड्यांचेच साम्राज्य आहे.

महाबळेश्वरमधील या खड्ड्यांबाबत सोशल मिडीयावरुनही मिम्स व्हायरल होत आहेत. चंद्रावरचे खड्डे समजून तुम्ही जिथे उतरलात तो चंद्र नसून पृथ्वीवरील महाबळेश्वर शहराकडे जाणारा रस्ता आहे.. चला पावती फाडा, अशा आशयाचे मिम्स सर्वत्र फिरत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मायभूमितील रस्त्यांची ही दयनीय अवस्था या पर्यटनस्थळाची शोभा वाढवत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाबळेश्वर- पाचगणी या मुख्य रस्त्यासह ठिकठिकाणी खड्ड्यात गेलेले रस्ते हे अपघातांना निमंत्रण देत आहेत. यामुळे स्थानिकांसह पर्यटकही हैराण झाले आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधी काहीअंशी खड्डेयुक्त रस्ते खड्डेमुक्त झाले ते काही कालावधीपुरते. गतवर्षीही या रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेतच राहिली. यानंतर एप्रिल महिन्यात महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर ठेकेदाराने धो धो पावसात डांबरीकरण केल्याचा प्रकार घडला. अशा दर्जाच्या कामाने खड्डेमुक्त महाबळेश्वर होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पर्यटनस्थळाकडे जाणारे ठिकठिकाणचे हे रस्ते खड्ड्यातच हरवले आहेत. या पर्यटन नगरीत प्रवेश करतानाच या जगप्रसिद्ध महाबळेश्वरला चहूबाजूंनी खड्ड्यांनी वेढले आहे की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

महाबळेश्वर ते पाचगणी हा अंदाजे 20 कि मी चा प्रवास सर्वांना धक्के खातच करावा लागत आहे. प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. दाट धुक्यात प्रवास करताना तर पर्यटकांसह स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्डयांमुळे रोज एक अपघात होत असून एखाद्याचा जीव गेल्यानंतरच संबंधितांना जाग येईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाबळेश्वरहून पाचगणी, वाई येथे शिक्षणासाठी येजा करणार्‍या विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे देखील मोठे हाल होत आहेत. सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांसाठी खड्डेच प्रमुख आकर्षणाचे ठिकाण बनले आहे?

महाबळेश्वर -पाचगणी या मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सर्वांनाच या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते खड्डेमुक्त करावेत.

-संतोष शिंदे माजी नगरसेवक महाबळेश्वर

Back to top button