सातारा : घोणसपूर येथील वृद्ध रुग्णाला डालग्यातून नेले रुग्णालयात | पुढारी

सातारा : घोणसपूर येथील वृद्ध रुग्णाला डालग्यातून नेले रुग्णालयात

प्रतापगड; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गाव हे मधुमकरंदगडाच्या पायथ्याशी असून स्वातंत्र्याची 75 वर्षे होऊनही मूलभूत सुविधांअभावी येथील रुग्णांचा आजही डालग्यातून प्रवास सुरू आहे. गुरुवारी एका वृद्ध महिलेला 12 किलोमीटर डालग्यातून उपचारासाठी न्यावे लागले. 4 तासांची पायपीट केल्यानंतर या वृद्धेला उपचार मिळाले.

गुरुवारी रस्त्याअभावी या गावातील अर्धांगवायूने आजारी असलेल्या श्रीमती कुसुम संभाजी जंगम (वय 65) यांना डालग्यात बसवून 12 किलोमीटर अंतरावरील महाबळेश्वरापर्यंतचा प्रवास भर पावसात करावा लागला. यासाठी सुमारे चार तास पायपीट ग्रामस्थांना करावी लागली. महाबळेश्वर तालुक्यात हे गाव असून या गावातील लोकांनी रस्त्याची मागणी करूनही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. आजपर्यंत गावाला हक्काचा रहदारीचा कायमस्वरूपी रस्ता नाही. वन खात्याची अडचण सांगून प्रत्येक वेळी लोकांचा मुलभूत हक्क आजवर राजकारण्यांनी डावलला आहे.

येथील लोकांनी गेल्या 15 वर्षांमध्ये स्वत: श्रमदान करून कच्चा रस्ता तयार केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी सुद्धा घोणसपूर रस्त्यावाचून आजही उपेक्षितच आहे. ग्रामीण भागातील सर्व गावे, वाडी, वस्ती जोडणारा कायमस्वरूपी डांबरी रस्ता नाही. चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पण, येथे माणसाला चालण्यासाठी रस्ता नाही, हे दुर्दैव आहे. नव्याने पाचशे, हजार एकरमध्ये होणार्‍या सहारा सिटी, लवासा सिटी उभारतांना धनिक लोक व व्यावसायिक भांडवलदारांना कधीही वन खात्याच्या परवानगीला अडचण आली नाही. परंतु, ग्रामीण भागात ज्यांनी अनेक वर्षे जंगल संपत्ती जीवापाड जपली त्यांना मात्र हक्काची रहदारीची व्यवस्था करायला लोकप्रतिनिधींना अडचण का येते? वनखात्याच्या परवानगीची आमची लक्षवेधी कोणत्यातरी अधिवेशनामध्ये कोण मांडेल का? असा सवाल घोणसपूर ग्रामस्थांनी केला आहे.

येथील दुधगाव सोसायटीच्या मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची मंजुरी असलेली पण फक्त स्थलांतराच्या परवानगीसाठीची फाईल सरकारी उदासीनतेमुळे मंत्रालयात धुळखात पडून आहे.

कोयना खोर्‍याचा हा भाग स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अजून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना दिसतोय. यामुळेच येथील युवक स्थलांतरित होत आहेत. महाबळेश्वर शहर आणि ग्रामीण भाग यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
– डॉ कुलदीप यादव, सामाजिक कार्यकर्ते

घोणसपूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अजूनही आदिवासींचेच जगणं
जगत आहेत. या अतिवृष्टीत जवळचा दवाखाना नसल्याने व रस्त्याअभावी डालग्यात रुग्ण टाकून महाबळेश्वरपर्यंत न्यावे लागत असेल, तर मग
आमच्यासारखे दुर्दैवी कोण असेल?
– किरण जंगम, स्थानिक ग्रामस्थ

Back to top button