सातारा : जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर धाड, 24 जणांना अटक | पुढारी

सातारा : जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर धाड, 24 जणांना अटक

इम्तियाज मुजावर

पाचगणी (जि. सातारा), पुढारी वृत्तसेवा : जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 15 हजार पाचशे रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जावळी तालुक्यातील ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एसडी खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत विभागाने कारवाई करत 29 जुलै 30 जुलैच्या दरम्यान तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत 21 गुन्हे दाखल करण्यात आले असून 24 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एसडी खरात, प्रतीक ढाले, जितेंद्र देसाई, केबी नडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये बनावट दारू निर्मिती व विक्री तसेच त्याची वाहतूक होत असल्यास त्याची लगेच माहिती द्यावी. सर्वसामान्य जनतेने याबाबत सतर्क रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा राज्य उत्पादक शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे.

Back to top button