भय इथले संपत नाही..! सातारा जिल्ह्यातील 124 गावे डोंगर कपारीखाली जीव मुठीत धरून

भय इथले संपत नाही..! सातारा जिल्ह्यातील 124 गावे डोंगर कपारीखाली जीव मुठीत धरून
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : डोंगर कोसळून गडप झालेल्या माळीण गावानंतर अशाच काही दुर्घटना घडल्या असून गुरूवारी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतही भुस्खलन होवून अनेकजण गाढले गेले. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील डोंगर कपारीखाली दडलेल्या अनेक गावकर्‍यांचा थरकाप उडाला. जिल्ह्यातील 124 गावे आजही जीव मुठीत धरून जीवन कंठत आहेत. प्रशासन या गावांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत असले तरी 'भय इथले संपत नाही' असे चित्र पहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे डोंगराच्या पहाडी कातळाखाली विसावलेली अन् निर्ढावलेली ही गावं माळीणसारखीच गडप होण्याचा धोका या गावकर्‍यांना वाटत आहे.

अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी दुर्घटनेची भीती

जिल्ह्यातील 124 गावांना दरडी कोसळण्याचा धोका असून त्यामध्ये यापूर्वी भुस्खलन झालेल्या अनेक गावांचा समावेश आहे. वाईच्या पश्चिमेकडील गोळेवाडी, गोळेगाव, जोर येथेही भुस्खलन होवून दुर्घटना घडली होती. सातार्‍यालाही भुस्खलनाचा धोका आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी माची पेठ परिसरात अलिकडच्या वर्षांत अनेक बांधकामे झाली असून ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी डोंगराचे कडे सुटण्याचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गावांचे करावे लागणार पुनर्वसन…

सातारा, जावली व पाटण तालुक्यातील 16 गावांमध्ये 199 निवारा शेड उभारण्यात आली आहेत. जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या भागातील 41 गावांचा सर्व्हे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) या संस्थेकडून करण्यात आला. त्यामध्ये पाटण तालुक्यातील आंबेघर (खालचे), ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, जितकरवाडी, महाबळेश्वर तालुक्यातील दरे, दुधोशी, येरणे बु॥, येरणे खुर्द, धावरी, चतुरबेट, एरंडेल, वाई तालुक्यातील कोंढावळे (देवरुखवाडी), जोर, सातारा तालुक्यातील भैरवगड व जावली तालुक्यातील भुतेघर या गावांचे पूर्णत: व अंशत: पुनर्वसन करावे लागणार आहे.

16 गावांमध्ये उपाययोजना

जिल्ह्यात 124 गावांना दरडींचा धोका असल्याचे आढळले आहे. पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यातील भूस्खलनग्रस्त 21 गावांचे काही ठिकाणी संपूर्ण व अंशत: पुनर्वसन करावे लागणार आहे. भविष्यातील धोका ओळखून 16 गावांमध्ये 199 तात्पुरत्या निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे.

भिलारच्या आठवणी थरकाप उडवणार्‍या

जुलै 2005 साली तुफान अतिवृष्टी होवून भिलार येथील नारळी बाग परिसरात जमीन खचली होती. परिसरातील जमिनींना भेगा पडून 38 कुटुंबियांची घरे पत्यांच्या बंगल्यासारखी कोसळली होती आणि एकच हाहाकार उडाला होता. ही थरकाप उडवणारी घटना इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने ताजी झाली आहे.

डोंगरालगतच्या भागातील घरांना धोका

अजिंक्यतार्‍याच्या कुशीत वसलेल्या सातार्‍याचा काही भाग डोंगरालगत आहे. शाहूनगर, चारभिंती पसिसर, माची पेठ, मंगळवार पेठ, पॉवर हाऊस झोपडपट्टी हा भाग डोंगराच्या टापूत येतो. त्याठिकाणी बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरीही त्याठिकाणी बेकायदा बांधकाम झाल्याचे आढळते.

जावलीतही घबराट

जावली तालुक्यातील क्षेत्र मेरूलिंगच्या महाकाय पठाराखालील अनेक घरे तग धरून आहेत. पायथ्याच्या जावळेवाडीलाही दरडी कोसळण्याचा धोका आहेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news