सातार्‍यात कोयता नाचवून दहशत | पुढारी

सातार्‍यात कोयता नाचवून दहशत

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोयता नाचवत दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार सातार्‍यातील मतकर कॉलनीत घडला. खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताने महिलेची छेडही काढली. या घटनेने परिसरात तणावाचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राम तुकाराम दुबळे, (रा. मतकर कॉलनी, गेंडामाळ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 27 जूनरोजी रात्री 10 वाजता घडली आहे.

संशयित राम दुबळे हा कोयता नाचवत सातार्‍यातील एका उपनगरात दगड मारत सुटला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक घरातून बाहेर आले. दगडफेकीच्या प्रकरणातून एका महिलेने संशयिताला जाब विचारताच त्या महिलेला संशयिताने मारहाण केली. संशयिताने महिलेची छेड काढून दमदाटी करत दहशत माजवली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परिसरातील आणखी एका नागरिकाने संशयिताला जाब विचारण्याचा प्रयत्न करताच संशयिताने त्यांनाही शिवीगाळ करत घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे परिसर हादरुन गेला. संशयित एवढ्यावरच थांबला नाही. त्याने बाहेर येवून उभ्या असलेल्या जीप, टेम्पो, कार या वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. सुमारे अर्धा तास संपूर्ण परिसराला संशयिताने वेठीस धरले. ‘माझ्या विरोधात कोणी तक्रार करायची नाही. तक्रार कोणी केली तर गाठ माझ्याशी आहे,’ असे म्हणून संशयित तेथून पसार झाला. या घटनेनंतर संबंधित महिलेने शाहूपुरी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. संशयिताची माहिती घेऊन त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तो पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Back to top button