सातारा : सकाळी जोरदार; दुपारनंतर भुरभुर | पुढारी

सातारा : सकाळी जोरदार; दुपारनंतर भुरभुर

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातार्‍यात मान्सूनने एंट्री केली असली तरी दुसर्‍या दिवशी सकाळी कोसळलेल्या सरी दुपारनंतर गायब झाल्या. अधूनमधून भुरभुर राहिली. दरम्यान, शेतकरी दमदार पावसाची चातकासारखी वाट पाहत असून ढगांनी अच्छादलेले आभाळ धो धो कोसळेल व पाण्याची चिंता मिटेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.

सुमारे महिनाभर ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली होती. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. दुपारी पावसाच्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. त्यानंतर मात्र मोठ्या सरी आल्याच नाहीत. मात्र बाजाराचा दिवस असल्याने अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे व्यापार्‍यासह नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्याच्या सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची रिमझिम सुरू होती. धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप होती.

महाबळेश्वरला जोर

महाबळेश्वरमध्ये पावसाचा काहीसा जोर पाहायला मिळाला. जिल्ह्यात रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पडलेल्या 24 तासांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 60.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 20.9 मि.मी., जावली 26.9 मि.मी., पाटण 14.3 मि.मी., कराड 5.1 मि.मी., कोरेगाव 25.8 मि.मी. खटाव 13.0 मि.मी., माण 24.1 मि.मी., फलटण 11.8 मि.मी., खंडाळा 19.5 मि.मी., वाई 17.1 मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button