एक महिन्यात टेंभू योजनेला दोन हजार कोटी : ना. देवेंद्र फडणवीस | पुढारी

एक महिन्यात टेंभू योजनेला दोन हजार कोटी : ना. देवेंद्र फडणवीस

दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा झाला होता. अडीच वर्षांत त्यांनी दुष्काळी भागातील एकाही सिंचन प्रकल्पाला मान्यता आणि निधी दिला नाही. आम्ही सहा महिन्यांत 29 योजनांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. आ. जयकुमार गोरेंच्या मागणीनुसार एका महिन्यात टेंभू उपसा योजनेला दोन हजार कोटींचा निधी आम्ही देणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी केली. आ. जयकुमारांचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न साकारायला आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दहिवडी येथे आयोजित भाजपच्या अतिविराट सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अमरसिंह साबळे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. राम सातपुते, आ. राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील, विक्रम पावसकर, भरत पाटील, प्रशांत परिचारक, मकरंद देशपांडे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भगवानराव गोरे, अंकुशभाऊ गोरे, सौ. सोनिया गोरे, अरुण गोरे, शिवाजी शिंदे, धनंजय चव्हाण, डॉ. संदीप पोळ आदींसह खटाव, माणसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्या दुष्काळाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढणार आहे. जिहे-कठापूरमुळे 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आतापर्यंत ही जमीन पाण्याखाली येऊ नये, अशी विरोधकांनी व्यवस्था केली. अडीच वर्षे नाकर्त्या लोकांचे सरकार आले. त्यांना जनतेशी, दुष्काळाशी देणेघेणे नाही, ते कसे जगतात याच्याशी देणेघेणे नाही. त्यांच्याकरिता तुम्ही फक्त व्होट बँक आहात. म्हणूनच आ. गोरे यांनी जी योजना मंजूर केली ती योजना त्यांनी अडवून ठेवली. मात्र, भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर जयाभाऊ भिडले. त्यांनी उडी सरकारमध्येही आणि पुलावरूनही घेतली; पण तुमच्या आशीर्वादामुळे त्यांना काही होणार नाही. रणजित व जयाभाऊंची ही जय-वीरूची जोडी आहे. जिहे-कठापूर योजनेचे भूमिपूजन केले याचा आनंद आहे. अडीच वर्षांनंतर आता पाणी येणार आहे.

हे पाणी डिसेंबरमध्ये येणार आहे; पण ऑक्टोबरमध्ये येणारी निवडणूक जयाभाऊ तुम्ही लढा. डिसेंबर 2024 मध्ये 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. यासाठी 370 कोटींचा निधी दिला आहे. योजनेसाठी पैशाची कमतरता भासूू देणार नाही, असा शब्दही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्या हातात दिली आहे. त्यांनी दुष्काळी भागासाठी जेवढी तिजोरी रिकामी करायची ते करा, असे सांगितले आहे, असे सांगून ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा खोर्‍यातील विनावापर 4 टीमएसी पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचे फेरवाटप करून ते पाणी सातारा, माण, खटाव व कोरेगाव भागाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कण्हेर व आरफळ योजनेतून बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी दुष्काळी भागात आणणार आहे. टेंभूची फेरप्रशासकीय मान्यतेचा निर्णय मागच्या सरकारने घेतला. मागच्या सरकारला निर्णय लकवा होता. त्यांचा पेन चालत नव्हता. आमचे सरकार आल्यावर 8 लाख हेक्टर सिंचन होणारे प्रश्न 6 महिन्यांत मंजूर झाले. एक महिन्याच्या आत टेंभूला 2 हजार कोटींची मान्यता देणार आहे. यातून 8 टीएमसी पाणी उपलब्ध होऊन 41 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळमुक्त करणार आहे. पाच वर्षांनंतर माणदेशाच्या दुष्काळावर कोणी कादंबरी लिहिणार नाही. त्यासाठी दुष्काळमुक्तीचे काम हाती घेतले आहे, असेही ते म्हणाले.

2014 ते 2019 या कालावधीत सत्तेत असताना जलयुक्त शिवारमधील कामे यशस्वी केली. त्यामुळे जिल्ह्यात 58 हजार टीसीएम पाणी सिंचनासाठी तयार करू शकलो. 48 हजार विहिरी, 3 हजार शेततळी तयार केली. या कालावधीत 48 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली. त्यापूर्वी 15 वर्षांत तेव्हा सिंचन प्रकल्प का झाले नाहीत? सातार्‍याने तुम्हाला भरभरून दिले; पण तरी देखील तुम्ही एकही योजना पूर्ण केली नाही. योजना पूर्ण करण्यासाठी केंद्रात मोदींचे तर राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार यावे लागले. प्रधानमंत्री सिंचन योजनेेअंतर्गत जिल्ह्यातील 5 धरणे व सर्व पाणी योजनांना मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्यामुळेच आज परिवर्तन होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्राला नरेंद्र मोदीजींनी सिंचन प्रकल्पासाठी 30 हजार कोटी दिले. त्यामुळे बंद पडलेले प्रकल्प सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या अनेक पक्ष पाटण्यामध्ये चालले आहेत. उद्या हातात हात घेवून मोदी हटावचा नारा देणार आहे. हे 2014 मध्येही केले होते. त्यावेळी 52 लोक व्यासपीठावर होते. पण काँग्रेसचे फक्त 48 लोक निवडून आले. मोदींजींना पर्याय तयार करत असताना हे सर्व एक नेता ठरवू शकत नाही. नेत्याविना निवडणूक लढवू असे सांगतात, पण जनता त्यांना निवडून देत नाही. मागच्या अ‍ॅटो रिक्षाचे सरकार पंक्चर झाले. तुमच्या आशिवार्दाने विरोधी पक्षनेतेपदाचा टायरही पंक्चर होईल, असेही ना. फडणवीस म्हणाले.

जयाभाऊं सारखा नेता माझ्यासोबत हे मला अभिमानास्पद…

मला अभिमान आहे की, जयाभाऊंसारखा नेता माझ्यासोबत आहे. तो जनतेसाठी त्याग करायला तयार आहे. जयकुमार जनता व ईश्वर तुमच्या पाठिशी आहे. जे तुम्ही ठरवले ते झाले आहे. जे तुम्ही ठरवले आहे त्यासाठी या व्यासपीठावरील सर्व नेते तुमच्या पाठिशी खंबीरपणे आहेत. तुमचा संकल्प आपण पूर्ण करू. माढा व सातार्‍याची लोकसभा आपण जिंकणार आहोत. सातारा जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहे. सातारा मोदी व शिवसेना-भाजपसोबत उभा राहत आहे, असे ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चोरीला गेलेली एमआयडीसी

जयाभाऊंनी आणली…

मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये म्हसवडला एमआयडीसी करायची होती; पण अडीच वषार्र्ंत इथे अख्खी एमआयडीसी चोरीला गेली होती. सरकार आल्यानंतर जयाभाऊ व रणजित यांनी मुंबई व दिल्लीत चकरा मारून आमची एमआयडीसी चोरीला गेली आहे. आमची एमआयडीसी परत करा, अशी मागणी केली. या भागातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हसवडला देत आहोत. यासाठी केंद्राने मंजुरी दिली असून निधीही देत आहोत. यामुळे या भागातील युवकांना रोजगार मिळेल. कॉरिडोरचे काम होत असल्याने मोठी गुंतवणूक येईल, असे ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Back to top button