सातार्‍यात ‘राहीबाई पोपेरे देशी वाणांचे मॉडेल’; 150 प्रजातींचे जतन | पुढारी

सातार्‍यात ‘राहीबाई पोपेरे देशी वाणांचे मॉडेल’; 150 प्रजातींचे जतन

सातारा; विठ्ठल हेंद्रे :  केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या राहीबाई पोपेरे देशी वाणांचे मॉडेल सातार्‍यात रूजू लागले आहे. आहारातील खाणं कसदार असाव अन् आरोग्य चांगले रहावे, यासाठी सातारा तालुक्यातील 4 गावांमध्ये 8 शेतकर्‍यांनी ‘देशी बियाणाच्या वाणांची बँक’ तयार केली आहे. हे शेतकरी एकमेकांना पैशांची देवाण-घेवाण करत नसून त्या बदल्यात एकमेकांना देशी बियाणांच्या वाणांचे अदान-प्रदान करत आहेत. दरम्यान, यामुळे दुर्मीळ होत चाललेल्या 150 वाणांचे जतन झाले आहे.

सातारा तालुक्यातील कुसवडे, मापरवाडी, आटाळी व राजापुरी या गावात अवघ्या 8 महिन्यांपूर्वी देशी बियाणांच्या वाणांची बँक उभारण्यात आली आहे. यासाठी सातार्‍यातील ‘अ‍ॅवॉर्ड’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत 8 शेतकर्‍यांना थेट राहीबाई पोपेरे यांच्या गावात नेवून अभ्यास सहल पूर्ण केली. शेतकर्‍यांना तेथील प्रोजेक्ट दाखवून बीज बँकेचे संकलन, संवर्धन आणि वृद्धी कशी करायची? याचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. हायब्रीड बियाणांऐवजी देशी बियाणे हे कसे किफायतशीर व रोगप्रतिबंधक आहे हे पटवून देण्यात आले आहे. आशाबाई कदम, शेवंता सराटे, निर्मला चव्हाण, शोभा पवार, तानाजी आटाळे, नारायण जाधव, विठ्ठल साळुंखे व लक्ष्मण साळुंखे या शेतकर्‍यांनी एकूण चार देशी बियाणांची बँक तयार केली आहे.

कणगी… गाडगं-मडकं… वाणावळा..

देशी वाण सापडल्यानंतर ते मिळाल्यानंतर कसे ठेवावे? याच्या घरगुती सोप्या पद्धती आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये कणगीमध्येही ही बियाणे सुस्थितीत राहतात. गावाकडे गाडगी-मडकी वापरली जातात. त्यामध्येही ही बियाणे राहू शकतात. याशिवाय लाकडाचे कपाट करुन लहान डब्यांमध्येही त्या ठेवल्या जाऊ शकतात. यासंबंधी या 8 शेतकर्‍यांची वेळोवेळी बैठक घेण्यात आली. प्रत्यक्ष बियाणांची साठवणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने ‘वाण लुटण्याचा’ कार्यक्रम होतो त्याच पद्धतीने 8 शेतकर्‍यांना बोलावून त्यांना एकमेकांकडे असलेले देशी वाण लुटण्यास सांगितले. अशा पद्धतीने दर तीन महिन्यांनी अशा वाणवळ्यांचा कार्यक्रम शेतकर्‍यांमध्ये घेतला जाणार आहे. यामुळे या शेतकर्‍यांच्या देशी वाणांच्या बँकेत नव्या वाणांची भर पडत जाणार आहे.

सातारचं देशी वाण दोन जिल्ह्यात…

सातार्‍यात सुरू झालेल्या या देशी बियाणे वाण बँकेची भुरळ नंदूरबार व अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही पडली असून त्यांनी देशी वाणांची मागणी केली आहे. याशिवाय सद्यस्थितीला गावांच्या माध्यमातून तालुका, जिल्हा व नंतर जिल्ह्याबाहेर देशी वाण बँकेचा पसारा वाढवला जाण्याचे प्रयोजन आहे. अर्थात हे सर्व करत असताना यामध्ये आवड असणार्‍या शेतकर्‍यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. कारण यामाध्यमातून आर्थिक फायदा नगण्य आहे मात्र दूरद़ृष्टी मोठी आहे.

Back to top button