सातारा : ३४८ वर्षांच्या जुन्या राजगादीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने उजाळा | पुढारी

सातारा : ३४८ वर्षांच्या जुन्या राजगादीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने उजाळा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : तब्बल ३४८ वर्षे ऐतिहासिक दस्तावेज म्हणून जपून ठेवलेले, सातारचा ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला तिथून मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ते पुन्हा सातारचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असा प्रवास करत आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सातारकरांसाठी खुले करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईने नटवलेल्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवलेली शिवरायांची ही राजगादी औत्सुक्याचा व कुतूहलाचा व श्रद्धेचा विषय ठरली आहे. छत्रपती घराण्याची महती जगभर आहे. इतिहासकालीन राजघराणे व त्याकाळातील सुवर्ण युगाविषयीची माहितीचे पुरावे आजही पाहावयास मिळतात. त्यातील अनेक पुरावे हे देश- विदेशातील अनेक संग्रहालयांत जपून ठेवण्यात आले आहेत. छत्रपती शिवरायांच्या वापरातील हे तक्त ३४८ वर्षे जुने असून हे तख्त जरीचे आणि सोन्याच्या तारांपासून बनवलेले आहे.

हे तख्त १९६९ मध्ये मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाकडून छत्रपती शिवाजी संग्रहालयाला प्राप्त झाल्याचे छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांनी हे तख्त रायगड येथे वापरले शिवाय अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपतींचे ५६ दिवस वास्तव्य होते. त्यावेळी सुद्धा हे तख्त तिथे वापरले गेल्याची माहिती शिंदे यांनी दिली. या अजिंक्यताऱ्यावरील वास्तव्यात छत्रपती शिवरायांनी पाली येथील दोन घराण्यातील वाद निश्चितपणे सोडवला होता अशी इतिहासात नोंद आहे या तख्ताला सोन्याच्या तारा आणि विशेष स्वरूपाचे जरी काम करण्यात आलेले आहे. या तख्ताची देखभाल अतिशय जिकिरीची आणि अवघड अशी असूनही गेल्या ५३ वर्षापासून छत्रपती शिवरायांची ही अनमोल ठेव अत्यंत सुरक्षित ठेवण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकाराने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त हे तख्त विशेष सुरक्षा व्यवस्थेत छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या मुख्य दालनामध्ये सातारकरांना पाहण्यासाठी शुक्रवारी खुले करण्यात आले. तख्त व शिवप्रतिमेचे पूजन दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे प्रवीण शिंदे यावेळी उपस्थित होते. यावेळी हरीष पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या रंगरंगोटीचे काम तडीस लावल्याबद्दल आणि शिव तख्ताच्या अनोख्या उपक्रमाबद्दल सुहास राजेशिर्के व प्रविण शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी अपशिंगे येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक कापसे उपस्थित होते. ३४८ वर्षे जुन्या असलेल्या राजगादीला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नव्याने उजाळा मिळाला आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल सुहास राजेशिर्के व प्रविण शिंदे सातारकरांकडून कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ऐतिहासिक व अविस्मरणीय व्हावी अशी आपली कल्पना होती. त्यांचा शिवकाळ प्रत्यक्ष जनतेला पाहता यावा, असे आपणाला वाटत होते. त्यामुळेच या ऐतिहासिक तख्ताची संकल्पना खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे मांडली. त्यांनी तातडीने त्याला मान्यता दिली. छत्रपती शिवाजी संग्रहालयातच हे ऐतिहासिक तख्त सातारकरांच्या दर्शनासाठी ठेवताना एक पुण्यकर्म केल्याचा आनंद होत आहे. सातारकरांनी व जिल्हावासीयांनीही या तख्ताचे दर्शन घ्यावे. – सुहास राजेशिर्के, माजी उपनगराध्यक्ष, सातारा

Back to top button