सातारा : बाजार समित्यांवरील प्रशासकराज येणार संपुष्टात; मतदार यादीची कार्यवाही सुरू | पुढारी

सातारा : बाजार समित्यांवरील प्रशासकराज येणार संपुष्टात; मतदार यादीची कार्यवाही सुरू

सातारा : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन वर्षांपासून बाजारसमितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आपत्तीजन्य परिस्थिती असल्याने सरकारने विद्यमान संचालकांना मुदतवाढ दिली. मात्र, मुदतवाढ दिल्यानंतरही निवडणुका लागल्या नाहीत. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांवर सुमारे 10 महिने प्रशासकराज आहे. प्रशासकांकडूनच बाजार समित्यांचा कारभार सांभाळला जात आहे. आता सहकार निवडणूक प्राधिकरणाने नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केल्याने प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. यामुळे आता तीन वर्षानंतर समित्यांना संचालक मिळणार आहेत.

मे 2020 हे सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वर्ष होते. मात्र, याच कालावधीत देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने निवडणुकाच झाल्या नाहीत. या कालावधीत सहकारी संस्थांचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी विद्यमान संचालकांना दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही राज्यातील बाजारसमित्यांची निवडणुक वारंवार लांबणीवर पडली. अखेर या नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

बाजार समित्यांची निवडणूक लागल्याने गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असणारे प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. संचालक नसल्याने प्रशासक असणार्‍या तालुक्याच्या सहायक निबंधकांना बाजार समिती कार्यालयाचे कामकाज करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी सहायक निबंधकांना आठवड्यातून दोन दिवस बाजार समितीसाठी वेळ द्यावा लागत होता. बाजारसमितीचे कामकाज, शेतमालाचा लिलाव, शेतकरी व व्यापार्‍यांच्या समस्या, विविध प्रकारचे कर यासह अन्य बाबींकडे प्रशासकांनी दिले. यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही बाजारसमितीसाठी तैनात रहावे लागले.

जिल्ह्यात सातारा, कराड, लोणंद, फलटण, पाटण, वाई या मोठ्या बाजारसमिती असल्याने त्या त्या तालुक्याच्या अधिकार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला. आता निवडणुकच लागल्याने नवीन संचालक मंडळ येणार आहे. त्यामुळे बाजारसमिती कामकाजाची जबाबदारी ही नवीन संचालक मंडळ घेईल.

Back to top button