सातारा : कराडजवळ अपघातात १५ पोलिस जखमी, तिघे गंभीर | पुढारी

सातारा : कराडजवळ अपघातात १५ पोलिस जखमी, तिघे गंभीर

कराड; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठीचा पाटण (जि. सातारा) येथील बंदोबस्त संपवून परत येत असताना पोलिसांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. त्यामध्ये तुरची (ता. तासगाव, जि. सांगली) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 15 पोलिस जखमी झाले. यातील तिघेजण गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

संदीप पवार, लक्ष्मण सुतार व अजित नलवडे, अशी गंभीर जखमी असलेल्या पोलिसांची नावे आहेत. कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत विमानतळाजवळ बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकने हुलकावणी दिल्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला जाऊन धडकली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याबाबत माहिती अशी, सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस गेल्या चार दिवसांपासून पाटण विधानसभा मतदारसंघात बंदोबस्तासाठी होते. मंगळवारी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल्समधून हे पोलिस कर्मचारी तुरचीकडे परत निघाले. त्यांची ट्रॅव्हल्स गोटे गावच्या हद्दीत विमानतळाजवळ आली असता अचानक ट्रक आडवा आला. त्यामुळे चालकाने ट्रॅव्हल्स बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला जाऊन धडकली.

Back to top button