सातारा : कलेढोण येथे एका रात्रीत सात ठिकाणी चोरट्यांचा डल्ला | पुढारी

सातारा : कलेढोण येथे एका रात्रीत सात ठिकाणी चोरट्यांचा डल्ला

कलेढोण : पुढारी वृत्तसेवा : कलेढोण (ता. खटाव) येथे एका रात्रीत सात ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन दवाखाने, एक मेडिकल, तीन किरणामाल दुकाने, एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. मुख्य पेठेत एका रात्रीत सात ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शेटे किराणामाल दुकानाचे मालक सदाशिव शेटे नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास आपल्या दुकानाची झाडलोट करण्यासाठी गेले असता दुकानाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना आपल्या शेजारील असणाऱ्या मेडिकल व किराणा मालाच्या दुकानाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.

डॉ. शिंदे यांचे दवाखान्याचे कुलूप तोडून सात हजार रुपये तर डॉ. पाटील यांच्या दवाखान्यातून एक हजार, संदीप साखरे यांच्या मेडिकल मधून आठ हजार रुपये व चांदीची मूर्ती, शरद साखरे यांचे किराणामाल दुकानातून अठराशे रुपये, प्रकाश ढोकळे यांच्या घरातून तीन हजार रुपये, सदाशिव शेटे यांच्या दुकानातून चारशे रुपये, धनंजय तारळेकर यांच्या किराणामाल दुकानातून दोनशे नव्वद रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच मायणी आऊट पोस्टचे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेची माहिती घेतली.

Back to top button