अमेरिकेच्या संशोधकाचे साताऱ्यात उद्या अस्थी विसर्जन | पुढारी

अमेरिकेच्या संशोधकाचे साताऱ्यात उद्या अस्थी विसर्जन

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा :  अमेरिकेतून संशोधनासाठी कोरेगावातील अपशिंगे येथे आलेल्या ली. आय. स्लेसिंगर यांनी पी. एचडी मिळवली. मात्र, त्यांनी गावाशी तब्बल ४० वर्षे ऋणाणूबंध जोडले. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे अमेरिकेत निधन झाले. त्यांच्या अस्थींचे विसर्जन भारतात करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या पत्नी पत्नी लिसा क्लोपर या त्यांच्या अस्थी घेवून अपशिंगेत आल्या आहेत. शनिवारी या अस्थींचे विसर्जन संगम माहुली येथे करण्यात येणार आहे.

१९७२-७३ या कालावधीत ली. आय. स्लेसिंगर हे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन शैलीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले. यानंतर १९७५ नंतर ते अपशिंगेत आले. शिकागो विद्यापीठाने त्यांना शिष्यवृत्ती देवून मानव वंश समाजशास्त्र या विषयावर संशोधन करण्यास सांगितले होते. पुण्यात मराठी भाषेचा त्यांनी अभ्यास केला. गावात आल्यानंतर ते गावच्या जीवनाशी एकरूप झाले.

ग्रामस्थ त्यांना मामा या नावाने हाक मारत असल्याने ते गावचे मामा झाले. त्यांच्या संशोधनात खेड्यातील वर्षभर चालणारे सण, लग्न सोहळे, शेती, पशुपालन, मजुरांची शेतातील कामे, ज्ञानेश्वरी पारायण, गाव जत्रा, महिलांचे व्रत वैकल्य यांचा बारकाईने अभ्यास केला. ली मामांनी गावकऱ्यांच्या हृदयात प्रेमाचे स्थान निर्माण केले. कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे एका वर्षातच त्यांनी आपला संशोधन कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे प्रकल्प पूर्ण केला. यानंतरही त्यांनी ४० वर्षे गावाशी ऋणाणूबंध ठेवले. त्यांच्या इच्छेखातरच त्यांच्या अस्थींचे भारतात विसर्जन करण्यात येणार आहे.

Back to top button