धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील : संभाजीराजे छत्रपती | पुढारी

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील : संभाजीराजे छत्रपती

कराड, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी जी जी मदत लागेल ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

नांदगाव ता. कराड येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात संभाजीराजे छत्रपती बोलत होते. कार्यक्रमास श्रीमंत अमरजीत राजे जहागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार व बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजीराव वाटेगावकर,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमंत युवराज संभाजी राजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांचे आदर्श घेऊन बहुजन समाजाने वाटचाल करणे आवश्यक आहे. बहुजन समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वंचित घटकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

धनगर समाज हा प्रामाणिक आहे. राजकीय नेते मंडळींनी त्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. धनगर समाजाने संघटित होऊन समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजेत. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची प्रलंबित आहे .ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या लढ्याला सर्वतोपरी सहकार्य राहील. प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठे योगदान आहे. या नेतृत्वाच्या पाठीमागे समाजाने ठाम राहिले पाहिजे. समाज एकसंघ राहिला तर प्रगती साध्य करता येईल.

प्रास्ताविक महावीर काळे यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्विनी हुलवान व आकाश पाटील यांनी केले. कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष सुनील शेंडगे, प. महाराष्ट्र युवकआघाडी अध्यक्ष दीपक राहींज, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष येळे ,सातारा जिल्हाध्यक्ष सागर डोंबाळे, कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात व विलासराव पोळ, महिला आघाडी अध्यक्ष सविता फसाले, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ फसाले, मराठवाडा अध्यक्ष सुनील बनसोडे, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश माने, सातारा जिल्हाध्यक्ष राम झोरे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय कात्रट आदी उपस्थित होते.

Back to top button