सातार्‍यातील फायरिंगप्रकरणी 3 पिस्टल जप्त | पुढारी

सातार्‍यातील फायरिंगप्रकरणी 3 पिस्टल जप्त

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील राजवाडा परिसरात आप्पा मांढरे यांच्यावर फायरिंग केल्या प्रकरणी मुख्य दोन संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत एकूण तीन पिस्टल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला (एलसीबी) यश आले आहे. दरम्यान, संशयितांनी ही शस्त्रे मध्यप्रदेशातून आणल्याचे सांगितले जात आहे.

ऋषभ राजेंद्र जाधव (वय 25, रा. रविवार पेठ, सातारा), चंद्रकुमार मारुती निगडे (वय 25, रा. पाटखळमाथा ता.सातारा) अशी संशयितांची नावे असून यातील ऋषभ जाधव हा सूत्रधार असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत अधिक महिती अशी, दि.9 नोव्हेंबर रोजी रात्री राजवाडा येथील गोलबागेजवळ आप्पा मांढरे (रा. मांढरे आळी, सातारा) यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी झालेल्या मांढरे यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला काही जणांची धरपकड करण्यात आली. आतापर्यंत दोनवेळा पकडापकडी झाल्यानंतर तिघांना अटक व दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. चार दिवसांपूर्वी मुख्य संशयितांना पकडल्यानंतर हल्ल्यामध्ये एका पिस्टलचा समावेश असताना संशयितांकडे आणखी घातक शस्त्रे असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार मुख्य संशयिताकडे कसून चौकशी सुरु असताना पोलिसांना आणखी दोन पिस्टल जप्त करण्यात यश आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, एलसीबीचे पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Back to top button