जागा 5, पक्ष 3 : कुणाला किती जागा मिळणार? मविआतील जागा वाटपाचा तिढा वाढणार

जागा 5, पक्ष 3 : कुणाला किती जागा मिळणार? मविआतील जागा वाटपाचा तिढा वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे, त्या पक्षाकडे ती जागा राहण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दोन, तर काँग्रेसचा एका जागेवर हक्क कायम राहणार आहे. त्यामुळे शहरातील आठपैकी उर्वरित पाच जागांवर महाविकास आघाडीतील तीन पक्षांची रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली आहे. शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. 2019 ला त्यामधील वडगावशेरी, हडपसर, पर्वती, खडकवासला या चार राष्ट्रवादी काँग्रेसने, कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट तीन जागा काँग्रेसने लढविल्या होत्या, तर कोथरूडच्या जागेवर सर्व सहमतीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर महायुतीत शहरातील सर्वच्या सर्व आठ जागांवर भाजपचे आमदार असल्याने आठ जागा भाजपने लढविल्या होत्या, शिवसेनेच्या वाट्यावर एकही जागा आली नव्हती.

आता 2024 च्या विधानसभेला सामोरे जाताना महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तिढा होण्याची शक्यता आहे. आघाडीत राष्ट्रवादीकडे आत्तापर्यंत पाच जागा असताना आता राष्ट्रवादी पवार पक्षाने थेट सहा जागांवर दावा केला आहे. तर गत निवडणुकीत एक जागेवर निवडणूक लढविणार्‍या ठाकरेंच्या शिवसेनेने सहा जागा मिळाव्यात अशी भूमिका घेतली आहे. तर अद्याप काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे जागा वाटप नक्की कसे करावे, याबाबत पेच निर्माण होणार आहे.

2019 च्या निकालानुसार कोण, कुठे दावेदार?

2019 च्या विधानसभेला राष्ट्रवादीने वडगावशेरी आणि हडपसर या दोन जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे आता हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे कायम राहतील. तर खडकवासला मतदारसंघात अवघ्या अडीच ते तीन हजारांनी राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. तर पर्वतीची जागा राष्ट्रवादीने लढविली होती. त्यामुळे या चार जागांवर राष्ट्रवादी पवार पक्षाचा दावा असेल, तर कसबा पेठला आता काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंटला अवघ्या पाच हजारांपेक्षा कमी मतांनी काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस या तीन मतदारसंघावर दावा करणार हे निश्चित आहे. तर कोथरूडची जागा दोन्ही पक्षांनी लढविली नव्हती. त्यामुळे येथे शिवसेना ठाकरे पक्षाला अधिक प्रबळ पध्दतीने दावा करता येऊ शकणार आहे. मात्र, आता जागा वाटप करताना नक्की काय निकष लावले जाणार यावर पुण्यातील आठ जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल.

कोणाचा कोणत्या मतदारसंघावर दावा

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार : वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट
  • शिवसेना उध्दव ठाकरे : कसबा पेठ, कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट

जागा वाटपाचा नक्की फॉर्म्युला काय असतो ?

आघाडी आणि युतीमध्ये आतापर्यंत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाची जागा आणि दुसर्‍या क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार आहे, तिथे तो पक्ष दुसर्‍या क्रमांकाचा दावेदार. या पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला आतापर्यंत निश्चित मानला जात होता. मात्र, आतापर्यंत युतीत निवडणूक लढविणारा शिवसेना ठाकरे पक्ष आता महाविकास आघाडीसमवेत असल्याने हा फॉर्म्युला अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे आता जागा निश्चित करताना कोणता फॉर्म्युला वापरला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

  • 'नीट' गोंधळाविरोधात 'आप' देशभर आंदोलन करणार : संदीप पाठक
  • Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनावेळी भाविकांना मारहाण, गुन्हा दाखल
  • मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट, आमची साधी दखल नाही : लक्ष्मण हाके

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news