ईव्हीएम : जाणून घ्या अमेरिकन आणि भारतीय प्रणालीतील फरक

ईव्हीएम : जाणून घ्या अमेरिकन आणि भारतीय प्रणालीतील फरक

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ईव्हीएम हे मानव अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) हॅक होण्याची भीती व्यक्त केली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव शेखर यांनी मात्र भारतीय ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारतातील ईव्हीएम प्रणालीबाबत थोडक्यात माहिती…

…अमेरिका… 

बॅलेट पेपरला पसंती

अमेरिकेत बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यास प्राधान्य दिले जात आहे. 2022 साली अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणातून 70 टक्के मतदार हे बॅलेट पेपरला पसंती देत असल्याचे पुढे आले आहे.

'डीआरई'द्वारे पडताळणी होत नाही

अमेरिकेत डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक (डीआरई) सिस्टीमद्वारे मतदान केले जाते. या यंत्रणेद्वारे मतदारांना मतदानाची पडताळणी करता येत नाही. पावती मिळत नाही.

खातरजमा नाही

टचस्क्रीन व्होटिंग मशिनद्वारे बॅलेट पेपर मिळत नाही. चुकीचे मतदान झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारेही खातरजमा करता येत नाही.

फिजिकल रेकॉर्ड नाही

इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे फिजिकल रेकॉर्ड राहात नाही. त्यामुळे मतदारांना माहिती मिळत नाही.

कंत्राट अनेक कंपन्यांना

डायरेक्ट रेकॉडिंग इलेक्ट्रॉनिक तयार करण्याचे कंत्राट विविध कंपन्यांना दिले जाते. त्यामुळे या मशिन्सच्या विश्वसनीयबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

अमेरिकेत हॅकिंग शक्य

इलेक्शन मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे (ईएमएस) निवडणुकीआधी ईव्हीएमचे प्रोग्रॅमिंग केले जाते. यामध्ये उमेदवारांचा डाटा भरला जातो. लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर हे काम केले जाते. या लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा वापर अन्य कामासाठी होतो. त्यावेळी त्यास इंटरनेट जोडले गेलेले असते. अशावेळी हॅकर व्हायरसद्वारे मशिन हॅक करू शकतात.

तीन युनिट

भारतीय ईव्हीएमची रचना तीन प्रकारे करण्यात आली आहे. कंट्रोल युनिट, बॅलेटिंग युनिट आणि व्हीव्हीपॅट या तीन युनिटद्वारे ईव्हीएमचे कार्य चालते. कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट पाच मीटर तारेने जोडलेली असतात.

…भारत…

ईव्हीएम बॅटरीवर चालतात

ईव्हीएमसाठी विद्युत संचाची गरज लागत नाही. मतदान आणि मतमोजणीचे काम बॅटरीवर चालते. ईव्हीएमही बॅटरीवर चालतात.

16 उमेदवारांची नोंदणी

बॅलेट युनिटवर मतदार बटण दाबून मतदान करतात. दुसर्‍या युनिटमध्ये मतदाराच्या मताची नोंद केली जाते. एका बॅलेट युनिटमध्ये 16 उमेदवारांच्या नावांची नोंदणी केली जाऊ शकते. जादा उमेदवार असल्यास बॅलेट युनिटला कंट्रोलिंग युनिटसोबत जोडले जाते.

24 बॅलेटिंग युनिट एकत्र

24 बॅलेटिंग युनिट एकत्र जोडली जातात, ज्याद्वारे नोटासह 384 उमेदवारांसाठी मतदान करता येऊ शकते.

मतदान कुठे?

कंट्रोल युनिट निवडणूक अधिकार्‍यांच्या ताब्यात असते, तर बॅलेट युनिट तिन्ही बाजूंनी झाकलेले असते. त्या ठिकाणी मतदार मतदानाचा हक्क बजावतात.

निळे बटण

बॅलेट युनिटवर पक्षाचे चिन्ह, उमेदवार नाव, उमेदवाराचा फोटो असतो. प्रत्येक उमेदवारासमोर एक निळे बटण असते. ते बटण दाबल्यावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते.

क्लोज बटण

अखेरचे मतदान झाल्यावर निवडणूक अधिकारी कंट्रोलिंग युनिटवरील क्लोज बटण दाबतात. त्यानंतर ईव्हीएमवर मतदान केले जाऊ शकत नाही.

रिझल्ट बटण

निकालादिवशी कंट्रोल युनिटवरील रिझल्ट बटण दाबल्यावर उमेदवारांना किती मते पडली, याची माहिती मिळते.

प्रोग्रामिंग एकदाच

ईव्हीएममध्ये एक मायक्रोप्रोसेसर असतो. एकदाच प्रोग्रामिंग केले जाते. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही. यामध्ये दुसरे सॉफ्टवेअर टाकता येत नाही.

खर्च किती?

एक ईव्हीएम युनिट तयार करण्यासाठी 8,700 रुपये खर्च येतो. जुन्या ईव्हीएममध्ये 3,800 मते टाकता येत होती. नव्या ईव्हीएममध्ये 2,000 मते टाकता येतात.

भारतीय ईव्हीएम ही कोणत्याही मीडियाशी अथवा नेटवर्कशी जोडली गेलेली नाहीत. त्यामुळे भारतीय ईव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news