कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात 19 ते 27 जून या कालावधीत 154 पोलिस शिपाई आणि 59 पोलिस चालक या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी 6 हजार 777 व चालक पदासाठी 4 हजार 668 असे एकूण 11 हजार 455 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलिस परेड ग्राऊंडवर भरतीसाठी उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, एका पदास दहा उमेदवार या प्रमाणात पोलिस शिपाई पदासाठी 1540 तर चालक पदासाठी 590 उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने प्रत्येक दिवशी 1400 उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. 14 टेबलवर कागदपत्रांची तपासणी करून दररोज पहाटे पाचपासून भरती प्रक्रिया सुरू होईल. पोलिस शिपाई पदासाठी 19 ते 22 जून या कालावधीत सर्व पुरुष उमेदवार तर 23 जून रोजी महिला उमेदवार आणि माजी सैनिक उमेदवारांची चाचणी होणार आहे. पोलिस शिपाई चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची चाचणी 24 ते 26 जून या कालावधीत तर महिला व माजी सैनिकांची 27 जून रोजी चाचणी होईल. भरती प्रक्रियेत अचूक वेळ मोजण्यासाठी तसेच उमेदवार डमी होऊ नये यासाठी आधुनिक पद्धतीचे आरएफआयडी व फेस रिकग्नायझेशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असेही जिल्हा पोलिसप्रमुख पंडित यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news