सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’वरून संघटनांमध्येच ‘कुस्ती’ | पुढारी

सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’वरून संघटनांमध्येच ‘कुस्ती’

सातारा; विशाल गुजर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी अधिकृतपणे कोणाची? असा प्रश्न पैलवानांना पडला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यावर अस्थायी समितीची स्थापना झाली. या समितीने स्पर्धेची घोषणा केली आहे. आता पुन्हा राज्य कुस्तीगीर परिषदेने स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने पैलवानांच्या संभ्रमात भर पडली आहे. दोन्ही संघटनांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती लागली आहे. या दोन्ही गटांच्या नादात मात्र पैलवानांचे नुकसान होत आहे.

नवीन सरकार आल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून अस्थायी समितीची स्थापना झाली. या अस्थायी समितीतर्फे आणि पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या सहकार्याने व पैलवान मुरलीधर मोहोळ संस्कृती प्रतिष्ठानतर्फे 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. दि. 15 ते 30 डिसेंबर दरम्यान कोथरूड (पुणे) येथे ही स्पर्धा होत आहे. त्यासाठी शहर, जिल्हा कुस्तीगीर, तालिम संघांच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 30 नोव्हेंबरपूर्वी घेण्यात याव्यात, असे कळवण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष संजयकुमार सिंह यांनी तशी घोषणा केली आहे. त्यातच आता राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी 2022-23 व वरिष्ठ राज्य अजिंक्यपद गादी व माती कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ ग्रीको रोमन, कुमार, महिला व युवा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक काढले आहे. या पत्रकामुळे नेमक्या कोणत्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरायचे? अशी विचारणा पैलवानांतून होऊ लागली आहे. राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. महासंघाने अस्थायी समिती स्थापन केली आहे. या स्थितीत राज्य कुस्तीगीर परिषदही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यास सरसावली आहे. त्यामुळे पैलवानांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

शासनाची मान्यता कोणत्या गटाला

अस्थायी समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांत स्पर्धा आयोजनाबाबत कुस्ती सुरू झाली आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा ही राज्यातील अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. दोन्ही गटांनी स्पर्धा आयोजनाबाबत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लांना शासनाच्या वतीने वर्षभर मानधन देण्यात येते. त्यामुळे दोन्ही गटांपैकी शासनाची मान्यता कोणाला मिळणार, याची उत्सुकता कुस्ती शौकिनांना लागली आहे.

पैलवानांमध्येही पडलेत गट

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नक्की कोण आयोजित करणार? यावरून वादंग सुरू आहेत. या नादात जे पैलवान एकमेकांच्या जीवाला जीव लावत होते. ते आता या संघटनांच्या नादात एकमेकांपासून दूर झाले आहेत. हा अस्थायी समितीचा तर तो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा असे दोन गटच पैलवानांमध्ये पडले आहेत. त्याचा फटका बसत पैलवानांनाच बसत आहे.

Back to top button