सातारा : आ. शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढा : आ. रामराजे नाईक-निंबाळकर | पुढारी

सातारा : आ. शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढा : आ. रामराजे नाईक-निंबाळकर

खेड; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात आज स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार खंडित करण्याचे सुरू असलेले प्रकार पाहिल्यानंतर दुःख वाटते. परंतु यशवंत विचारांची पुन्हा नव्याने मोट बांधून राष्ट्रवादीचा स्वाभिमान उभा करण्यासाठी आणि शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज राहा. देगावचा हा मेळावा कोरेगावच्या राजकारणातील आणि शशिकांत शिंदे यांच्या राजकीय आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरेल, असा विश्वास विधान परिषदचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

देगाव, ता. सातारा येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, सारंग पाटील, ऋषिकांत शिंदे, सौ. वैशाली शिंदे, तेजस शिंदे, साहिल शिंदे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. आ. रामराजे ना. निंबाळकर म्हणाले, नवीन
कार्यकर्ते तयार करताना पैशाच्या मागे जाणारे कार्यकर्ते नकोत, पैशासाठी सत्ता व राजकारण नको. शरद पवारांचा स्वाभिमानी जिल्हा उभा करण्यासाठी एकमेकांमधील वाद बाजूला ठेवून शशिकांत शिंदे यांना येणार्‍या काळात पुन्हा विधानसभेत पाठवू. त्यासाठी आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. देगावची ही गर्दी त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारी ठरणार आहे.

पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी नाराज होण्याचे कारण नाही. राजकारण, समाजकारणात एकदा वाहून घेतल्यानंतर माघार घेणे योग्य होणार नाही. गावपातळीवरील भांडणे, पाय ओढण्याची स्पर्धा थांबली असती तर शशिकांत शिंदे पराभूत झाले नसते. त्यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून राष्ट्रवादीचा स्वाभिमानी विचार जागृत करण्यासाठी जि.प. प. स. निवडणुकीसह जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचा करिष्मा दाखवून देवू.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, मेडिकल कॉलेजची जागा शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना मिळाली असून पुढे अजितदादांनी त्यासाठी 450 कोटीचा निधी दिला. यासाठी बाळासाहेब पाटील यांनीही प्रयत्न केले. शशिकांत शिंदे हे तळमळीचे नेते आहेत. तीन वर्षांपूर्वी शरद पवारांच्या दूरदृष्टीने राज्यात क्रांती झाली आता पुन्हा कोरेगाव, खटाव सातार्‍यातून क्रांती करूया. तुमचा प्रतिनिधी हा या मतदारसंघाचा टर्निंग पॉईंट असून शशिकांत शिंदे यांना पुन्हा खांद्यावर घेऊन नाचूया आणि पवारसाहेबांकडून कोरेगावच्या विकासाची गदा देत देगावचे देवगाव करून हा भाग तेजाने उजळून लावण्यास कटिबद्ध राहूया.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, यश अपयश आयुष्यात प्रत्येकाला मिळत असते. राजकारणात शुन्यातून मंत्रीपदावर जाताना शरद पवारांसारखा नेता आणि लोकांचे आशिर्वाद, प्रेम मिळाले. गर्दीतील कार्यकर्ता ओळखणारे नेते या देशात फक्त पवारसाहेब आहेत. पराभवानंतरही त्यांनी पुन्हा मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली तर राजकारणातून चांगला कार्यकर्ता संपू नये यासाठी विधानपरिषदेवर घेतले, हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. मेडिकल कॉलेज, जनता दरबार यासाठी काम केले. त्यावेळी अजितदादा, रामराजे, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील या सर्वांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवू शकलो.

आज जिल्हाला तोडण्याचे काम सुरू असून युवकांनी जिल्ह्यात पुन्हा स्वाभिमान उभा करून जि.प. प. स. निवडणुकीत राष्ट्रवादीची स्वाभिमानी क्रांती घडवून आणावी. आपल्यातील सगळे गट-तट बाजूला ठेवून काम करुया. एकजुटीने उभे रहा.

आमदारांचा पैशाचा गर्व खाली आणा : आ. शशिकांत शिंदे

अपघाताने निवडून आलेला आमदार पराभूत होईल. आपली लढाई लबाड, गद्दार, हुकूमशाही अपप्रवृत्तींशी असून आमदारांचा पैशाचा गर्व खाली आणा आणि जिद्दीने उभे राहून या मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीची क्रांती घडवा. त्यासाठी हा शशिकांत शिंदे अहोरात्र काम करून कोणाशी, कधीही कोणत्याही परिस्थितीत लढायला मागे हटणार नसल्याची ग्वाही आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

Back to top button