पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग : अजित पवार | पुढारी

पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग : अजित पवार

वरकुटे-मलवडी; पुढारी वृत्तसेवा : पन्नास लोकांचे सरकार राज्यातील विकासकामाचा आराखडा बनवायचे सोडून अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहे. माणमध्ये सुद्धा तात्यांनंतर गलिच्छ राजकारण सुरू झाले. माणमधील काहीजण अगोदर अपक्ष, नंतर काँग्रेस, मग भाजप असे करत आहेत. मात्र, राजकारणात असे चालत नाही, असा टोला विधान सभेचे विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार यांनी आ. जयकुमार गोरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला. मार्डी, ता. माण येथील माजी आमदार स्वार्गीय सदाशिवराव पोळ तात्या यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, मनोज पोळ, श्रीराम पाटील, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, दिलीप तुपे, बाळासाहेब सावंत उपस्थित होते. आ. अजितदादा म्हणाले, मंत्रालयात गेल्यानंतर मला कर्मचारी सांगतात की दादा पन्नास लोकांचे सरकार फक्त आमच्या बदल्या कारण्यात व्यस्त झाले आहे.

मार्जितले अधिकारी आपापल्या भागात आणण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत असून दादा हे कुठेतरी थांबवा, असे सांगून आ. अजितदादा पवार म्हणाले, माणमधील राजकारण हे अतिशय खालच्या पद्धतीचे सुरु झाले आहे. तात्यांच्या काळात असे कधीच झाले नाही. काहीजण अपक्ष निवडून येतात. पुन्हा काँग्रेसमध्ये जातात तिथे निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये जातात, आता पुन्हा कुठे जाणार माहिती नाही, असे चालत नाही.तात्यांनी कायम राष्ट्रवादीसोबत राहून तालुक्याचा विकास करताना सर्वात जास्त पाजरतलाव माणमध्ये बांधले. विकासासाठी ते नेहमी पवारसाहेबांकडे भांडायचे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे. येत्या लोकसभेला माढा मतदार संघातून पवारसाहेबांच्या विचाराचा खासदार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. आ. पवार म्हणाले, तुमचा उस चांगल्या कारखान्याला घाला, ज्याचा काटा चांगला असेल, बिल वेळेवर मिळेल अशाच ठिकाणी उस घाला, नाहीतर पुन्हा माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका. अधिकार्‍यांनो कोणाच्या दबावाला बळी पडून काम करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. कार्यकर्ता चुकला तर जरूर कारवाई पण नाहक त्रास देऊ नका, असा दमही त्यांनी अधिकार्‍यांना भरला.

नष्ठावंत चारच राहिले तरी चालतील

आ. अजितदादांनी आपल्या भाषणात काही गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांना गद्दारी करायची त्यांनी खुशाल उघड जावा. माझ्यापर्यंत तक्रारी येतेच, त्यामधील काहीजण आजही खाली बसलेत व काहीजण स्टेजवर सुद्धा बसलेत. त्यावेळी उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. अजितदादा म्हणाले, निष्ठावंत चारच राहिले तरी चालतील मात्र गद्दारांची फौज घेऊन राजकारण करता येत नाही.

राजकारण करणार्‍यांना करू दे, आपण काम करू…

मुंबई-बंगलूर कॉरिडॉर संदर्भात बोलताना आ. अजितदादा पवार म्हणाले, दि. 3 मार्च 2022 रोजी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा प्रकल्प माणदेशात मंजूर करावा, असे आदेश झाले होते. त्याचे पत्र अजितदादा यांनी सभेत वाचून दाखवले; मात्र आजही हा प्रकल्प मूळ जागेवरच होईल त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. ज्यांना त्याचे राजकारण करायचे आहे त्यांना जरूर करू द्या, आपण काम करू, असे आ. अजितदादा यांनी सांगितले.

Back to top button