कोयनेच्या ‘त्या’ 15 टीएमसीने रोखला महापूर | पुढारी

कोयनेच्या ‘त्या’ 15 टीएमसीने रोखला महापूर

पाटण, गणेशचंद्र पिसाळ : कोयना धरण शंभर टक्के भरले असून पावसाचा हंगाम संपायला आता काही दिवस दिवसच उरले आहेत. यावर्षी धरणात तब्बल 141 टीएमसी पाण्याची आवक झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणीवापर , विनावापर पाणी सोडूनही या पाण्यामुळे पूर्वेकडे पूर, महापुराची कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही.

गतवर्षी कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयनेतील अतिरिक्त पाणीवापर हाच महापूर रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. निश्चितच हा अतिरिक्त पाणीवापर सार्वत्रिक फायदेशीर ठरत असल्याने याबाबतचा नैसर्गिक व तांत्रिक अभ्यास करताना केवळ लवादाचा बागुलबुवा न करता यासाठी सकारात्मक ठोस पावले उचलणे हेच सार्वजनिक हिताचे ठरणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे .

महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले. यावर्षी आत्तापर्यंतच्या पावसात धरणात तब्बल 141 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. या पाण्यातून पश्चिम वीज निर्मितीसाठी 15.52,पूर्व सिंचनासाठी 4.27, पूरकाळात 5.84 , विनावापर सोडलेले 28.82, विमोचन दरवाजातून 0.71 अशा तब्बल 55.16 टीएमसी पाण्यानंतरही धरणात तब्बल 105 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी राज्यातील कोळसा टंचाईमुळे कोयनेतून ज्यादा वीजनिर्मिती झाली होती. पश्चिम वीजनिर्मितीच्या आरक्षित लवाद कोठ्यापेक्षाही पंधरा टीएमसी अतिरिक्त पाणी वापर झाला होता. निश्चितच तो 15 टीएमसी अतिरिक्त पाणीवापर सार्वत्रिक फायद्याचा ठरला हेच आता सिद्ध झाले आहे. जर त्या काळात त्या पंधरा टीएमसी पाण्याचा अतिरिक्त वापर झाला नसता तर यावर्षी याच पाण्याने ऐन पावसाळ्यात धरणाच्या पूर्वेकडे महापूराची शक्यता निर्माण केली असती. या महापुरातून मोठ्या प्रमाणावर सार्वत्रिक हानी झाली असती.

गतवर्षी याच पंधरा टीएमसीच्या जीवावर अतिरिक्त वीज निर्मितीतून राज्यातील कोळसा व अन्य वीज निर्मितीसाठी लागणार्‍या साहित्यांसाठी कोट्यवधींची बचत झाली तर अतिरिक्त फुकटच्या जलविद्युत निर्मितीतून कोट्यवधींचा महसूल मिळाला. पूर्वेकडे महापूर आपत्तीतून होणार्‍या नुकसानासाठी द्यावी लागणारी कोट्यवधींची नुकसान भरपाईही वाचली. त्यामुळे कोयनेच्या पाण्याचा अतिरिक्त वापर हा सार्वत्रिक फायद्याचाच ठरणार हेच यावरून स्पष्ट झाले आहे. केवळ लवादाचा तांत्रिक व कायदेशीर बागुलबुवा न करता दरवर्षीच अतिरिक्त पाणीवापर करून सार्वत्रिक हित जोपासावे अशा अपेक्षा जलतज्ञांसह सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहेत.

यावर्षीही अतिरिक्त पाण्याचा वापर शक्य

भलेही आठवडाभराचा कालावधी शिल्लक असला तरी गेल्या काही वर्षांपासून बदललेले निसर्गमान पाहता अगदी नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडतो.आत्तापर्यंतचा पाणीवापर पाहता पश्चिम वीजनिर्मितीसाठी 15.52 चा वापर झाल्याने लवादाचा आरक्षित 52 व सिंचनाचा अपेक्षित 25 व मृतसाठा 5 अशा सरासरी 82 टीएमसीची गरज 31 मे पर्यंत आहे . धरणात 105 टीएमसी पाणी शिल्लक असून अद्यापही पाऊस बाकी आहे. त्यामुळे या नैसर्गिक व तांत्रिक गोष्टींचा अभ्यास झाला तर याहीवर्षीही अतिरिक्त पाणीवापर व सार्वत्रिक हित सहजशक्य आहे.

Back to top button