सातारा : ‘कोयने’त 740 दशलक्ष युनिट वीज निर्मिती | पुढारी

सातारा : ‘कोयने’त 740 दशलक्ष युनिट वीज निर्मिती

पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  1जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात जून महिन्यातील अपुर्‍या पावसामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून जल विद्युत निर्मितीला मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर अपेक्षित वीज निर्मिती सुरू आहे. मध्यंतरची तूट भरून काढत कोयनेच्या चार प्रकल्पांतून आजपर्यंत 740 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 24.750 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे.

यावर्षी जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळी हंगाम व कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षारंभाला अपेक्षित पाऊस नसल्याने सिंचनापेक्षाही वीज निर्मितीबाबत सार्वत्रिक चिंता वाटत होती. जुलै, ऑगस्ट व सध्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस व सिंचन व वीज निर्मितीसाठी मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर सार्वत्रिक चिंता मिटली आहे.

एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात 17 सप्टेंबरपर्यंत चार वीज निर्मिती प्रकल्पातून 740.369 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काहीसा पाणी वापर जादा झाला असून त्यातून 24.750 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे. उर्वरित साडेआठ महिन्यांसाठी पाणी वाटप लवादाचा 52.44 टीएमसी आरक्षित पाणी कोटा शिल्लक आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 15.06 टीएमसी पाण्यावर 702.734 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. गतवर्षी आत्तापर्यंत 14.24 टीएमसीवर 678.275 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी पश्चिमेकडे 0.82 टीएमसी पाणी वापर जादा झाला असला तरी त्यामुळे 24.459 दशलक्ष युनिट वीज निर्मिती जादा झाली आहे.

पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून ते पाणी कोयना नदीत सोडण्यात येते. आजवर सिंचन 4.26 व पूरकाळात 5.42 अशा एकूण 9.68 टीएमसी पाण्यावर 37.635 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. गतवर्षी सिंचन व पूर काळात सोडलेल्या 8.12 टीएमसी पाण्यावर 37.344 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 1.56 टीएमसी पाणी वापर जादा झाल्याने 0.191 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता यावर्षी एकूण 24.74 टीएमसी पाण्यावर 740.369 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 22.36 टीएमसी पाण्यावर 715.619 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 2.38 टीएमसी पाणीवापर ज्यादा व 24.750 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे.

तर वीज निर्मिती ठप्प झाली असती…

लवादाप्रमाणे पश्चिम वीज निर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी आरक्षित आहे. मागील वर्षी अतिरिक्त पाणी वापर झाल्याने ऐन उन्हाळ्यातील संकट लक्षात घेऊन शासनाने पश्चिमेला अतिरिक्त 15 टीएमसी वापरायला परवानगी दिली होती. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच गतवर्षी 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले. गेल्या काही वर्षात सिंचनासाठी सरासरी 35 टीएमसी पाणी पाण्याची गरज भासते सुदैवाने गतवर्षी 21.70 टीएमसी मध्येच सिंचनाची गरज भागल्याने त्याचा अतिरिक्त वीज निर्मितीसाठी फायदा झाला; अन्यथा पश्चिमेला अतिरिक्त पाणी वापरासाठी परवानगी देऊनही अपुर्‍या पाण्याअभावी वीज निर्मिती ठप्प झाली असती.

 

Back to top button