जावली तालुक्याच्या राजकारणात गरमागरमी | पुढारी

जावली तालुक्याच्या राजकारणात गरमागरमी

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी जावली तालुक्यात एकमेकांवर टीकास्त्र सोडले. यामुळे जावली तालुक्याच्या राजकारणात चांगलीच गरमागरमी अनुभवायला मिळाली.

निवडणुकांच्या तोंडावर तालुक्यात येणार्‍या प्रवृत्तींना भूलू नका : आ. शिवेंद्रराजे भोसले

मी कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेच अडचण आलेली नाही व येणारही नाही. जी लोकं तालुक्यात कार्यरत आहेत, तुमच्या सुख दु:खात तुमच्या सोबत आहेत त्यांच्या बरोबर रहा, त्यांच्या पाठीशी रहा. मृगजळ म्हणून कोणीतरी बाहेरून येणार्‍यांच्या पाठीमागे धावू नका, केवळ निवडणुकांच्या तोंडावर जावलीत येऊन, दौरे काढून जनतेला भूलवायचे असे प्रकार सूरू आहेत मात्र अशा प्रवृत्तींना भूलू नका, असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

सर्जापूर (ता. जावली) येथे विविध विकासकामांचे उदघाटन व भूमीपूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, गेल्या 12 वर्षांपासून जावलीच्या जनतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा-जावली असा भेदभाव केला नाही व करणारही नाही. विकासकामांबरोबरच येथील शेतकर्‍यांचा उसही अजिंक्यतारा कारखाना दरवर्षी गाळप करत आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून जो खर्‍या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्याच पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी केले.

काहींनी वेगळे मार्ग स्वीकारले आहेत मात्र त्यांना योग्य वेळी नक्की कळेल. त्यांच्या मागे किती लोक आहेत ते. ज्यांना मी ताकद दिली, मोठे केले त्यांनी आता वेगळा मार्ग घेतला आहे. मात्र त्यांना ताकद दिली ती माझी चूक झाली. मात्र यापुढे योग्य वेळ आल्यावर ती चूक सुधारून जनतेच्या मनातील खंत दूर करून करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असा टोला सुहास गिरी यांचे नाव न घेता आ. शिवेंद्रराजे यांनी लगावला.

जावलीच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध असून कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी जावली सोडून जात नसतो, असा ठाम विश्वासही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्तकेला.

कार्यक्रमास उपसभापती सैारभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच सैा, स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयूर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. सुत्रसंचालन अतुल बोराटे यांनी केले तर नितिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले.

आत्तापर्यंत दुर्लक्ष केले पण आता यावेच लागेल : आ. शशिकांत शिंदे

मी निवडणुकीपुरता जावली तालुक्यात येत नसतो. माझ्याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे आणि मला कुणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. माझ्या पाठीशी शरद पवारांचा हात आहे. इथं वातावरण तसं चांगलं होतं म्हणून जावलीत लक्ष देत नव्हतो. मात्र आता जावली तालुक्यात यावं लागणार, सगळेच पत्ते आता ओपन करायचे नसतात वेळ आल्यावर कोणता पत्ता कधी टाकायचा, हे मला माहित आहे, असा पलटवार आ. शशिकांत शिंदे यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता केला.

सर्जापूर (ता. जावली) येथील कार्यक्रमात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टिकेला त्यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. प्रारंभी आ. शिंदे यांनी कुडाळ येथील पिंपळ बन ओपन जिमचे उद्घाटन केले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, उपसभापती सौरभ शिंदे उपस्थित होते.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. निवडणूक होईल किंवा नाही हे त्या त्या वेळेस ठरेल मात्र लढणे शशिकांत शिंदे यांच्या रक्तात आहे. त्यामुळे लढाई कोणतीही असो मी मागे हटत नाही, असे सांगत त्यांनी बँकेच्या निमित्ताने थेट आव्हानच दिले.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, जावलीशी माझे जुने नातेसंबंध आहेत. या तालुक्याने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. लोकांशी माझे ऋणानुबंध आहेत. तालुक्याच्या विकासासाठी यापूर्वीही मी प्रयत्न केले आहे. आजही मी कटिबद्ध आहे. आता फक्त राजकारण म्हणून विकासाकडे न पाहता जनतेचे हित साधले जावे. माझा तसाच प्रयत्न राहणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात दोन्ही आमदारांच्या वक्तव्याने जावलीत राजकीय गरमागरमीचे वातावरण तयार झाले आहे. आरोप-प्रत्यारोप यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही याबाबत सोशल मीडियावर फैरी झडत आहेत. आगामी काही महिन्यांत जिल्हा बँकेसह पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मातब्बर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा हा जनतेच्या दृष्टीने कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

Back to top button