सातारा : चाफळ विभागात बिबट्याची दहशत | पुढारी

सातारा : चाफळ विभागात बिबट्याची दहशत

चाफळ; पुढारी वृत्तसेवा :  चाफळ विभागात बिबट्याची दहशत आहे. बिबट्या भरदिवसा पाळीव प्राण्यावर हल्ला चढवू लागला आहे. मंगळवारी दुपारी कोचरेवाडी (चाफळ) ता.पाटण येथील निलेश गुलगे यांच्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. निनाईदेवी मंदिरा जवळील माथनेवाडी शिवारात ही घटना घडली.

खराडवाडी येथील किसन निवृत्ती खराडे यांच्या शेळीला मंगळवारी रात्री छपरातून डोंगराकडे ओडत नेत तिचा फडशा पाडला. दहादिवसापूर्वी दादासो कृष्णत खराडे, सुनील खराडे, तानाजी पाटील यांच्याही शेळीचा बिबट्याने फडशा पडल्यामुळे खराडवाडी परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण आहे.

विभागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गत आठवड्यात धायटी येथे बिबट्याने प्रवीण विजय देशमुख यांच्या शेळीचा फडशा पाडला होता.धायटी परिसरानंतर आता बिबट्या खराडवाडी, कोचरेवाडी गावाकडे आला आहे. बिबट्या भरदिवसा पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभाग कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बिबट्याने शेळी फस्त केल्यानंतर फक्त पंचनामे करण्यातच अधिकारी धन्यता मानत आहेत.

विभागातील वाडी -वस्तीवर अनेक शेळ्यांवर बिबट्याने हल्ले चढवून पशुधन धोक्यात आणले आहे. हा बिबट्या अचानक शेळ्यांच्या कळपावर व जनावरांच्या शेडमध्ये घुसून हल्ला चढवू लागला आहे. मंगळवारी दुपारी कोचरेवाडी ता.पाटण येथील माथनेवाडी नावाच्या शिवारात येथील निलेश गुलगे यांची जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. येथेच झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले.गुराख्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर बिबट्या शेळी घेऊन पळून गेला.दरम्यान रात्री परत खराडवाडी परिसरात किसन खराडे यांच्या शेडमध्ये इतर जनावरासह शेळ्या बांदल्या होत्या.रात्रीच्या सुमारास बिबट्याने खराडे घरी आल्याचे पाहुन शेडमध्ये थेट प्रवेश करत शेळीवर हल्ला चढवून डोंगराकडे नेत ठार मारले.

Back to top button