सातारा : अतिवृष्टीने 30 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; जावलीतील शेतकरी चिंताग्रस्त | पुढारी

सातारा : अतिवृष्टीने 30 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; जावलीतील शेतकरी चिंताग्रस्त

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा :  जावली तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 30.10 हेक्टर शेती व शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

गेल्या काही दिवसांमध्ये मेढा, केळघर, कुडाळ, करहर परिसरात ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे शेतीचे 5.50 हे. क्षेत्रामधील सोयाबीन व भातशेतीचे सुमारे 105 शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तर, ऑगस्टमधील अतिवृष्टीत करंदोशी, बेलावडे, सांगवी, सोनगाव या चार गावातील 142 शेतकर्‍यांच्या 20.77 हे. शेती पिकांचे तर 3.8 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. यात दरड कोसळणे, जमीन खरडून जाणे, जमीन वाहून जाणे असे नुकसान झाले आहे. मेढा व आनेवाडी सर्कलमध्ये सुमारे 30.10 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
जावलीत आज अखेर 1458.8 मि. मि. पाऊस झाला असून बुधवार दि. 7 सप्टेंबर रोजी मेढा सर्कलमध्ये 87 मि. मी. पाऊस पडला होता.
ऑगस्टमध्ये ढगफुटी झाल्याचा फटका एकीकडे बसला असताना गणेशोत्सवात व त्यानंतरही जावलीत कोसळधार सुरूच आहे. त्यामुळे पिके कुजण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनीही नुकसानीची पाहणी करून संबंधितांना पंचनाम्याच्या सूचना केल्या. प्राथमिक अहवालानुसार करंदोशी, सांगवी, सोनगाव, बेलावडे येथील 4 लाख 21 हजार 845 रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांनी अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करून मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Back to top button