सातारा : ऐतिहासिक राजवाडा आमच्या ताब्यात द्या : खा. उदयनराजे | पुढारी

सातारा : ऐतिहासिक राजवाडा आमच्या ताब्यात द्या : खा. उदयनराजे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील मध्यवर्ती असणार्‍या ऐतिहासिक राजवाड्याची गुरुवारी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी पाहणी केली. यावेळी सातारा पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते. राजवाड्यावर देखरेख आणि दुरुस्ती यांचे कोणतेही थेट नियंत्रण नसल्याने राजवाडा परिसराची रया गेली आहे. या राजवाड्याच्या संवर्धनासाठी तो परत आमच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी यावेळी खा. उदयनराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

सातारा शहराचा ऐतिहासिक राजवाडा म्हणजे अनेक ऐतिहासिक परंपरांचा साक्षीदार आहे. या राजवाड्यामध्ये झुंबरखाना, खलबतखाना त्याचबरोबर राज दरबार मराठा भित्तीचित्रांची आर्ट गॅलरी असे विविध विभाग होते. गेल्या वीस वर्षांपर्यंत राजवाडा इमारतीमध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालय सातारा नगरपालिका इत्यादी शासकीय कार्यालये होती. सध्या राजवाड्यामध्ये प्रतापसिंह हायस्कूलचे काही वर्ग भरत आहेत. मात्र राजवाड्याचा पूर्वेकडील भाग बरासा रिकामा असून तो बंद आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये राजवाड्याच्या अंतर्गत भागामध्ये बर्‍याचशा चोर्‍या झाल्याने हा परिसर म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा असा झाला आहे.

राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले यांची बर्‍याच वर्षांपासून हा राजवाडा ताब्यात देण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी आहे. या संदर्भात दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी खा. उदयनराजे भोसले यांनी या राजवाड्याची पाहणी केली. राजवाड्याच्या विविध कक्षांची या निमित्ताने पाहणी करुन उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना विविध कागदपत्रांसह माहिती पुरवली.

राजवाड्याचा ऐतिहासिक रुबाब कायम ठेवण्याकरता तातडीने या राजवाड्याची ऐतिहासिक पद्धतीने देखभाल आणि दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्याकरता हा राजवाडा तत्काळ आमच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व गोष्टी बारकाईने तपासून या प्रक्रियेतील कायदेशीर बाबी पाहू व त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठवून निर्णय घेऊ, असे आश्‍वासन उदयनराजे यांना दिले.

Back to top button