सातारा : युवकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप | पुढारी

सातारा : युवकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जमिनीचा वाद व मारहाण झाल्याच्या कारणातून युवकावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याप्रकरणी रविंद्र गोरख निकम (रा.जांब बु. ता. कोरेगाव) यास 5 वे अतिरिक्‍त जिल्हा न्यायाधिश एस.जी. नंदीमठ यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2014 मधील ही घटना असून मृत युवक 18 वर्षाचा होता.

याबाबत अधिक माहिती अशी, मूळ घटना 5 सप्टेंबर 2014 साली सांयकाळी जांब खु. येथे घडली होती. जमिनीचा वाद व मारहाण झाल्याचा राग यातून रविंद्र निकम याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी ऋषीकेश निकम (वय 18) याच्यावर हल्‍ला चढवला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला. खूनप्रकरणी ऋषीकेश याचे चुलते जितेंद्र जयसिंग निकम (वय 34, रा. जांब बु॥) यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कोरेगावचे तत्कालीन पोनि प्रकाश धस यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

याप्रकरणी विशेष जिल्हा सरकारी वकील म्हणून विकास पाटील-शिरगावकर यांची नियुक्‍ती झाली. कोर्टात बचाव व सरकार पक्षाच्यावतीने युक्‍तिवाद झाला. इतर संशयितांची यातून सुटका झाली. मात्र आरोपी रविंद्र निकम याला दोषी ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी शिक्षा ठोठावली.

Back to top button