सातारा : खासदार श्रीनिवास पाटलांचे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नितीन गडकरींना साकडं | पुढारी

सातारा : खासदार श्रीनिवास पाटलांचे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नितीन गडकरींना साकडं

कराड; पुढारी वृत्तसेवा : शिरवळ, वेळे, पारगाव येथे उड्डाणपूल उभारावा, महामार्ग सहापदरीकरणाच्या कामाला गती द्यावी, पाटण शहराजवळील पुलाचे काम पूर्ण करावे. तसेच सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा मार्गांच्या विविध तक्रारींचा निपटारा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली. महामार्गांच्या प्रश्नाबाबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक तक्रारी येत असून त्याचा निपटारा होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गा लगतच्या भुयारी मार्गांवर पाणी साचल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.  संपूर्ण पावसाळ्यात ही समस्या कायम राहिल्याने रस्ता ओलांडणे कठीण होते. संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करून त्वरीत समस्या सोडवावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

महामार्गावरील वेळे (ता.वाई) येथील ठिकाण अपघातस्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. याठिकाणी उड्डाणपुलाची गरज आहे. यापूर्वी केलेल्या मागणीनुसार एनएचएआय टीमने घटनास्थळाला भेट दिली होती. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून उड्डाणपूलाची जागा निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खंडाळा तालुक्यातील पारगाव व शिरवळ औद्योगिक क्षेत्र येथे उड्डाणपुल उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सातारा-कागल रस्त्याच्या सहापदरीकरणाला तसेच कराड शहराच्या कोल्हापूर नाक्यावरील अतिरिक्त उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती देण्यात यावी. कराड ते उंब्रजकडे जाताना असलेले धोकादायक वळण काढावे. कराड-चिपळूण राज्यामार्गाचे काम पूर्ण करावे. कराड-विटा मार्गावरील सुर्ली घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती द्यावी. कार्वेजवळील कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम त्वरीत व्हावे. सुरूर-पाचगणी-महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्याची देखभाल करावी व या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासह अन्य मागण्या खासदार पाटील यांनी यावेळी केल्या. या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार डॉ.अमोल कोल्हे, रणजीतसिंह निंबाळकर, धैर्यशील माने, श्रीकांत शिंदे, संजय मंडलीक, सुजय विखे यांच्यासह अन्य खासदार उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button