मृत्यूपूर्वी त्याने वाचवले २५ प्रवाशांचे प्राण! पुणे -सातारा हायवेवर बसचालकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

मृत्यूपूर्वी त्याने वाचवले २५ प्रवाशांचे प्राण! पुणे -सातारा हायवेवर बसचालकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गावरून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीवरील बसचालकांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूपूर्वी स्वतःला चक्कर आल्याचे जाणवल्याने बसचालकाने प्रसंगावधान ओळखून एसटी रस्त्याच्या बाजूला घेतली होती. यामुळे २५ प्रवांशी बचावले; मात्र त्यानंतर चालकाचे निधन झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जालिंदर रंगराव पवार (वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) असे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या बसचालकाचे नाव आहे.

राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागातील वसई आगारातून जाणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ३३४९) म्हसवडकडे प्रवांशी घेऊन जात होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे (ता. भोर ) गावच्या हद्दीत बुधवारी (दि. ३) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी वाहक संतोष गवळी यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली.

अधिक माहिती अशी की, बुधवारी वसईवरून आलेली एसटीबस दुपारी साडेबारा वाजण्याच्या स्वारगेट बसस्थानकामध्ये पोहचली. यावेळी बसचालक संतोष कांबळे यांना बदली चालक म्हणून जालिंदर पवार आले. खेड शिवापूर टोलनाका पास करून वरवे गावच्या हद्दीत आल्यावर एसटी बसचा वेग मंदावला. याबाबत वाहकाने बसचालक जालिंदर पवार यांना विचारणा केली असता त्यांनी चक्कर येत असल्याचे सांगून बस रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबविली. वाहकाने पवार यांना पुन्हा आवाज दिला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वाहकाने प्रवाशांच्या मदतीने नसरापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Back to top button