सातारा : वाठार स्टेशन येथे सर्व पक्षांच्यावतीने रेल रोको आंदोलन | पुढारी

सातारा : वाठार स्टेशन येथे सर्व पक्षांच्यावतीने रेल रोको आंदोलन

वाठार; पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे शुक्रवारी (दि.२९) रोजी रेल्वे गेट नंबर ४५ च्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडल्याने वाठार पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक होत रेल रोको आंदोलन केले.

सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथे गेट नंबर ४५ येथे एक भुयारी पादचारी मार्ग रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. परंतु, या पादचारी मार्गाचे काम गेली एक वर्ष रखडल्याने या पादचारी मार्गामुळे वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

यामुळे वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थांनी याबाबतीची वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार व काम चालू करण्यासंदर्भातली मागणी केली होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले. याच दरम्यान आज सर्व पक्षांच्या वतीने रेल रोको केला.

हे रेल रोको आंदोलन एवढे मोठे होते की, या गेट नंबर ४५ च्या रेल्वे रुळावर सर्व आंदोलनकर्ते बसून ढोल- ताशाच्या गजरात रेल्वे प्रशासनाचा निषेध करत होते. तसेच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देत होते. यावेळच्या घोषणांनी परिसर दणामून गेला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button