नगर : शिक्षक बनला पोलिस उपनिरीक्षक | पुढारी

नगर : शिक्षक बनला पोलिस उपनिरीक्षक

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सुरेगाव प्राथमिक शाळेतील शिक्षक किशोर जाधव यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. सुरेगाव (गंगा) प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षेत किशोर जाधव यांनी यश मिळविले.

सुरेगाव ग्रामस्थांनी व शिक्षकांनी मठाधिपती उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. जाधव यांचे मूळगाव तालुक्यातील खामगाव असून त्यांच्या पत्नी चित्रा गायकवाड जाधव या खुपटी प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. यावेळी उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, शिक्षण क्षेत्राप्रमाणेच पोलिस खात्यात सुद्धा जाधव उत्कृष्ट काम करतील. गुन्हेगारांवर कारवाई करून गोरगरिबांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका सातत्याने त्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना शिक्षक जाधव यांनी सुरेगाव ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञा व्यक्त करतानाच प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना तळमळीने अध्यापन केले. तसेच पोलिस खात्यातही काम करताना कोणावर विनाकारण अन्याय करणार नसल्याचे सांगितले.
यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे, अण्णासाहेब पटारे, सरपंच महेश शिंदे, प्रा. रमेश शिंदे, अंकुश शिंदे, मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव, राजाभाऊ बेहळे, भास्कर नरसाळे, अमोल काळे, राहुल गवळी, नितीन डहाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावकर्‍यांचे दातृत्व

याच कार्यक्रमात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी सुरेगाव प्राथमिक शाळेच्या विकासासाठी अकरा हजार रुपये व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी पाच हजार रुपये रोख स्वरूपात देणगी उद्धव महाराज यांच्या हस्ते शाळेला दिली.

Back to top button