कास पठार, ठोसेघर धबधबा रस्ता ब्लॉक | पुढारी

कास पठार, ठोसेघर धबधबा रस्ता ब्लॉक

परळी : पुढारी वृत्तसेवा : कास, ठोसेघर परिसरात रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने कास पठार आणि ठोसेघर रस्ता काही वेळ अक्षरश: ब्लॉक झाला होता. यवतेश्वर आणि बोरणे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वीकेंडचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक कोंडीत अडकल्याने त्यांंचा हिरमोड झाला. दरम्यान, दुर्घटना घडल्याने केळवली धबधबा पर्यटकांना सध्या बंद करण्यात आला आहे.

वीकेंडमुळे रविवारी ठोसेघर, भांबवली, सज्जनगड परिसर ओसंडून गेला होता. सातार्‍याबरोबरच राज्यातील ठिकठिकाणच्या पर्यटकांनी ठोसेघर आणि सज्जनगडावर गर्दी केली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटक अडकून पडले होते. गेल्या काही

दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे परळी खोर्‍यातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. सातार्‍यासह महाराष्ट्रातील पर्यटक दाखल होवू लागले आहेत. रविवारी ठोसेघर, भांबवली, कास पठार चाळकेवाडी पवनचक्की पठार या भागाला जत्रेचे स्वरूप आले. केळवली धबधब्यात दुर्घटना घडल्याने या परिसरात ग्रामस्थ व पोलिसांनी पर्यटकांना मज्जाव केल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक पुन्हा ठोसेघर सज्जनगडकडे जात असल्याने दुपारनंतर घाट रस्ता जाम झाला होता. बोगदा ते ठोसेघर बोगदा ते कास या रस्त्यावर वाहनांची तोबा गर्दी झाली होती. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता.

त्यातच हुल्लडबाज पर्यटकांनी बेशिस्त पार्किंग केल्याने वाहतूक कोंडीत भर पडल्याचे दिसत होते. घाटात अडकून पडले असताना त्यात हा त्रास झाल्याने वादावादीचे प्रकार घडले.

Back to top button