कास पठारावर दोन वर्षांनंतर पर्यटकांची पावले; आजपासून पठार खुले | पुढारी

कास पठारावर दोन वर्षांनंतर पर्यटकांची पावले; आजपासून पठार खुले

सातारा : संजीव कदम

जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठारावरील रंगोत्सव सुरू झाला असून यंदा हंगामाला चांगलाच रंग चढणार आहे. हे पठार आजपासून पर्यटकांसाठी खुले होत आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात या पठारावर फुलांचा गालिचा पाहायला मिळणार असून देश-विदेशातील पर्यटकांची पावले दोन वर्षांनंतर या पठारावर पडणार आहेत.

कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागले असून पठारासह डोंगररांगा हिरवळल्या आहेत. पंधरवड्यानंतर पठारावरील फुलोत्सवाला बहर येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे या पठारावर पर्यटकांची पावले पडलीच नाहीत. संपूर्ण हंगामात कासवर पर्यटकांना बंदी होती. त्याच्या आदल्या वर्षी पावसामुळे हंगाम पूर्णपणे बहरलेला होता. मात्र पावसामुळे पर्यटकांच्या भेटीवर मर्यादा राहिली होती. 2018 च्या तुलनेत 2019 च्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी राहिली होती. त्यामुळे यंदा हे पठार दोन वर्षांची पर्यटकांची फुलोत्सवाची आस पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असं हे देखणं रूप सध्या पाहायला मिळत असून हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग आठ-पंधरा दिवसांनी बदलताना दिसत असला तरी सध्या रंगीबेरंगी फुले तुरळकच दिसत आहेत. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात डोळ्यांचे पारणे फेडणार आहे.

या पुष्प पठारावर क्षणात सूर्यकिरणांतील इंद्रधनुषी छटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवाहवासा क्षण प्रत्येकालाच मोहात टाकणारा असतो. गर्द धुके, हिरव्यागार विविध रंगांच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणू धरतीवरचा स्वर्ग असल्याचा भास येथे येणार्‍या प्रत्येकालाच होतो. हा नजराणा गेल्यावर्षी कोरोनामुळे पर्यटकांसाठी उलगडलाच नाही. संपूर्ण हंगाम काळात या पठारावर पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना येथे येता आले नाही. आता मात्र कोरोनाचा जोर ओसरला असून पर्यटन खुलले आहे. त्यामुळे हे पठार पर्यटकांसाठी बुधवार, (दि. 25)पासून खुले होत आहे. सध्या पठारावर तुरळक स्वरूपात फुले आली असून सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात गालिचा फुलणार
आहे.

कास

असे जाता येईल कास पठारावर

सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आले आहे. सातारा शहरापासून (हायवे) अवघ्या 25 कि.मी.वर हे पठार वसले आहे. सातार्‍यात आल्यानंतर राजवाडा किंवा समर्थ मंदिर व तेथून पुढे बोगद्याच्या अलीकडून यवतेश्वर घाटातून जावे लागते. परजिल्ह्यातून येणार्‍यांना सातार्‍यात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, शिवराज पेट्रोल पंप किंवा लिंब खिंड येथून जावे लागते. या सर्व ठिकाणांहून शहरातील पोवई नाका या मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर तेथून रयत शिक्षण संस्था, नगरपालिका कार्यालय मार्गे थेट समर्थ मंदिर व तेथून पुढे यवतेश्वर घाटातून जावे लागते. कोल्हापूर बाजूकडून येणार्‍यांसाठी शेंद्रे येथूनही जाता येते. त्यासाठी बोगदा मार्गे यवतेश्वर घाटाकडे मार्गस्थ होता येते. पुणे ते सातारा हे 110 कि.मी. अंतर असून कोल्हापूर ते सातारा हे अंतर 125 कि.मी. आहे. सातार्‍यात महामार्गापासून पठारापर्यंतचे अंतर सुमारे 25 किलोमीटर भरते.

पर्यटकांची संख्या पाहून एस.टी. सुरू होणार

कास पठारावर जाण्यासाठी राजवाडा बसस्थानकातून एस. टी. बस सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन मंडळाला देण्याचा विचार वन विभाग करत आहे. हंगाम पूर्ण बहरू लागल्यानंतर पर्यटक वाढले तर ही बससेवा सुरू होणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

कास

प्रवेश शुल्क 100 रुपये; बुकिंग ऑनलाईन

कास पठारावर येणार्‍या पर्यटकांकडून 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी ुुु.ज्ञरी.ळपव.ळप ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी असणार्‍यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

दिवसभरात 3 हजार पर्यटकांनाच प्रवेश

पठारावर दिवसभरात 3 हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. तीन तासाच्या चार बॅच तयार केल्या जातील. पर्यटकांच्या प्रत्येक बॅचला तीन तासानंतर पठारावरून माघारी फिरावे लागेल. एका बॅचमध्ये सुमारे 750 पर्यटक असतील. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

कास

कास हंगामासाठी 140 कर्मचार्‍यांची नियुक्ती

कोरोना संकटामुळे गतवर्षी बंद असलेला कासचा हंगाम दि. 25 पासून सुरू होत आहे. या हंगामाची पूर्वतयारी कास पठार कार्यकारी समितीमार्फत पूर्ण झाली आहे. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार आहे. त्याबाबत समितीने तयारी केली असून 6 गावातील 140 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

प्रत्येक कर्मचार्‍यांसाठी कामे विभागून देण्यात आली आहेत. यामध्ये पार्किंग व्यवस्था विभाग, स्वच्छता विभाग, गाईड्स विभाग, कार्यालय विभाग, माहिती पुस्तिका विक्री केंद्र विभाग, तिकिट चेक पोस्ट, बस तिकीट कलेक्शन, उपद्रव शुल्क वसुली नियोजन, रात्र पाळी नियोजन, बस डिझेल पुरवठा इत्यादी कामाप्रमाणे कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर विभागप्रमुखही नेमण्यात आले आहेत. कामाचे स्वरुप आणि जबाबदार्‍या याविषयी वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी, सचिव निलेश रजपूत, समिती सदस्य गोविंद बादापूरे, सोमनाथ जाधव, अध्यक्ष मारुती चिकणे, श्रीरंग शिंदे, बजरंग कदम, दत्तात्रय किर्दत, ज्ञानेश्वर आखाडे यांनी प्रशिक्षण दिले आहे. पार्किंग तसेच दळणवळण भागाची पाहणी करुन त्याच्या साईडपट्ट्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. शौचालय पाईपलाईन व दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत.

कास पठारावर सध्या चांगले ऊन पडल्याने लवकरच फुलांचे गालिचे बहरणार आहेत. सध्या काही दुर्मिळ फुले उमलली आहेत.
– मारूती चिकणे
अध्यक्ष कास पठार समिती

Back to top button