सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पाऊण तास कोंडी | पुढारी

सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पाऊण तास कोंडी

खेड;  पुढारी वृत्तसेवा :  सातारा – कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सोमवारी दुपारी भर पावसात सुमारे पाऊण तास वाहतूक कोंडी झाली. या ठिकाणी एका अवजड वाहनाला वळण घेताना अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प होऊन चौकातील चारही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचे हाल झाले.  यावेळी चौकात वाहतूक पोलिस नसल्याने चालकांनी मनमानी करत वाहतुकीला अडथळा केला. त्यावेळी नजीकच्या रिक्षाचालकांनी रस्त्यावर येऊन ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.

सातारा शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच या ठिकाणी सोमवारी दुपारी वाढे चौकातून सेवा रस्त्याने आलेले बारा चाकी एक अवजड वाहन पोवई नाक्याकडे जाण्यासाठी वळण घेताना अडकले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यातच या ठिकाणी सातत्याने सेवा बजावणारे वाहतूक पोलिसही नसल्याने काही चारचाकी वाहनचालक मिळेल त्या जागेने वाहने दामटवत अडथळा करू लागले होते.

त्यामुळे वाहतुकीचा गुंता वाढत गेला. चारही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामध्ये एक रूग्णवाहिकाही अडकली होती. वाहतूक पोलिस नसल्याने नजीकच्या रिक्षा थांब्यावर असलेल्या रिक्षा चालकांनी मोहीम हाती घेऊन सुमारे पाऊन तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. चौकात वाहतूक कोंडी झाल्याचे समजल्यानंतर काही वाहतूक पोलिस या ठिकाणी आले तोपर्यंत ठप्प झालेली वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली होती.

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच होत असते. उड्डाणपुलाखाली दुभाजक नसल्याने वाहनचालक मिळेल त्या मार्गाने वाहने दामटवत असतात. त्यामुळे येथे वाहतुकीला शिस्त नसते. तर वारंवार होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी उड्डाणपुलाखालील रस्ता दुरूस्त करून खड्डे बुजवण्याचीही गरज आहे. तसेच या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी होत आहे.

Back to top button