सातारा हादरला! प्रेयसीचा गळा आवळून खून; दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले | पुढारी

सातारा हादरला! प्रेयसीचा गळा आवळून खून; दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले

सातारा : पुढारी वृत्तसेवा; वेलंग (शिरंबे) ता.कोरेगाव येथे प्रेयसीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिल्‍याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्हा हादरला असून, या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

योगिता हुंडे (वय 38), तर मुलगा समीर व मुलगी तनू अशी मायलेकरांची नावे आहेत. दत्ता नारायण नामदास (सर्व मूळ रा. राजेबोरगाव ता. उस्मानाबाद सध्या रा. वेलंग (शिरंबे) ता.कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. दत्ता नामदास आणि त्याची प्रेयसी गावात भाड्याच्या खोलीत राहत होते. बाहेरुन घर बराच वेळ बंद असल्याने परिसरात ग्रामस्थांना शंका आली. घर उघडून पाहिले असता, योगिता मृत अवस्थेत दिसल्या. याबाबतची माहिती रहिमतपूर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयित दत्ता नमदास हा गावात नव्हता.

पोलिसांनी त्याच्या नातलगांची माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी दत्ता याला अकलूज येथील कामेगाव येथून ताब्यात घेतले. पोलिस संशयिताकडे कसून चौकशी करत असताना त्याने मुलांचाही विहरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. शुक्रवारी दुपारी ज्या ठिकाणी मुलांना विहिरीत ढकलून दिले तेथे पोलिसांनी पाहणी केली असून दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

हे ही वाचलंत का? 

Back to top button