अलमट्टीत आवश्यक तेवढाच पाणीसाठा करा | पुढारी

अलमट्टीत आवश्यक तेवढाच पाणीसाठा करा

अंकली : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू झाल्यावर कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना महापुराची धास्ती असते. त्यामुळे अलमट्टी धरणात आवश्यक तेवढेच पाणी साठवण्यात यावे, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंता एच. सुरेश यांच्याकडे केली. यासंबंधीचे निवेदन त्यांना देण्यात आले.

२०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नदीकाठचा परिसर धास्तावलेला दिसतो. महापूर नियंत्रणासाठी कृती समिती वर्षभरापासून अभ्यास करत आहे. समितीच्या शिष्टमंडळाने अलमट्टी धरणाची पाहणी करुन सुरेश यांची भेट घेतली. कृष्णा नदीच्या उगमस्थानापासून ते अलमट्टी जलाशयापर्यंत सुमारे कृष्णा नदीच्या पात्रात ३५ नद्यांचा संगम आहे.

कोयना धरण ते राजापूर बंधार्‍यापर्यंत कृष्णा नदीचा उतार चांगला आहे. राजापूर बंधारा ते अलमट्टी धरणापर्यंत कृष्णा नदीचा उतार खूपच कमी आहे. मुख्य अभियंत्यांनी जलसंपदा सचिवांशी चर्चा करणे आवश्यक आहे. सध्या धरणात ४२ टीएमसी पाणी आहे. अचानक अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा फुगवटा होतो. ऑगस्टनंतरही धरण भरु शकते. त्यामुळे सुरुवातीलाच पाणी साठवणे योग्य नाही. आवश्यक तेवढेच पाणी साठवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी मुख्य अभियंत्यांनी पाणी साठवणे, पाणीपातळी आणि विसर्ग या बाबी जलसंपदा सचिव ठरवतात, असे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या जलसंपदा सचिवांची बैठक घेण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यावेळी सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता सुकुमार पाटील, राकेश जगदाळे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button