सातारा : जिल्ह्यातील 513 प्राथमिक शाळा दुर्गम क्षेत्रात | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 513 प्राथमिक शाळा दुर्गम क्षेत्रात

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील 513 शाळा दुर्गम व 2 हजार 177 शाळा सुगम क्षेत्रात येत असल्याची यादी जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केली. त्यामुळे निवड समितीने घोषित केलेल्या शाळेनुसारच बदल्यांची कार्यवाही होणार आहे. मात्र सुगम व दुर्गम शाळांबाबत काही शिक्षकांनी नाराजी दर्शवली असून ते न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची चर्चा आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. ग्रामविकास विभागाने रखडलेली बदल्यांची प्रक्रिया सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा बदलीपात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार क्रमांकासह अन्य आवश्यक माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला सादर केली आहे. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी सात निकष लावले होते.

सातारा जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शिक्षकांच्या बदल्यांसाठी 4 निकष लावले आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक संघटनांनी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांसह मंत्र्यांची भेट घेवून निकष कमी करण्याची मागणी केली होती. जिल्ह्यात 2 हजार 690 प्राथमिक शाळा असून त्यापैकी 229 शाळा अवघड क्षेत्रात येत आहेत.सात निकषापैकी 4 किंवा 4 पेक्षा जास्त निकष पूर्ण करणार्‍या शाळांची यादी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रसिध्द केली होती. त्यावर जिल्ह्यातून 379 आक्षेप शिक्षण विभागाकडे आले. या आक्षेपांची पडताळणी करण्यात आली.

अवघड क्षेत्र घोषित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिध्द करुन हरकती मागवण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकतीवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार निर्णय होवून जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील 1 ते 7 निकषांपैकी 3 किंवा 3 पेक्षा जास्त निकष पूर्ण करणार्‍या शाळांची यादी अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सुमारे 513 शाळा अवघड (दुर्गम) क्षेत्रात आल्या असून 2 हजार 177 शाळा सुगम क्षेत्रात आल्या आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या दुर्गम क्षेत्रातील शाळांवर काही शिक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. समितीने अवघड व सुगम क्षेत्रातील शाळा जाहीर केल्यानुसार आता बदल्यांची प्रक्रिया राज्याचा ग्रामविकास विभाग ऑनलाईन पध्दतीने राबवणार आहे.

अशा आहेत दुर्गम शाळा

जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 236, महाबळेश्‍वर 103,जावली 70, सातारा 63,वाई 30, कराड 10, कोरेगाव 1 अशा 513 शाळा दुर्गममध्ये येत आहेत. तर उर्वरीत फलटण, माण, खटाव व खंडाळा तालुक्यात एकही शाळा दुर्गम क्षेत्रात येत नसल्याचे समितीने जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट होत आहे.

Back to top button