मला माझा मतदानाचा हक्क मिळायलाच हवा.! ज्येष्ठ नागरिकाची हाक; मात्र प्रतिसाद नाही | पुढारी

मला माझा मतदानाचा हक्क मिळायलाच हवा.! ज्येष्ठ नागरिकाची हाक; मात्र प्रतिसाद नाही

वानवडी : पुढारी वृत्तसेवा : ‘मला मतदान करायचं आहे, माझा मतदानाचा हक्क मला मिळालाच पाहिजे,’ अशी साद वानवडी येथील 77 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने निवडणूक आधिकार्‍यांना घातली आहे. मात्र, त्यांना अद्याप कोणीताही प्रतिसाद मिळाला नाही. मतदार यादीत असलेले नाव अचानक गायब झाल्यामुळे या व्यक्तीच्या जिवाची घालमेल झाली. पुणे लोकसभा व कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील वानवडी येथे राहणारे सतीश वसंत होनावर (वय 78) हे मतदानाचा हक्क मिळाल्यापासून न चुकता आत्तापर्यंत मतदान करीत आले आहेत. मात्र, या वर्षी मतदार यादीत त्यांचे नावच आले नाही.

हे समजल्यानंतर त्यांनी तडख निवडणूक विभागाचे कार्यालय गाठले. अखेर त्यांना त्यांच्या घरच्यांची नावे मतदार यादीत मिळाली. पण स्वत:चे नाव मात्र मिळाले नाही. एका ठिकाणी तर संपूर्ण कुटुंबीयांची नावे यादीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. सतिश होनावर म्हणाले, मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मी मतदान करत आलो आहे. मात्र, यंदा मतदार यादीत माझे नाव नाही. यादीत नाव नाही, ही चूक माझी नाही. निवडणूक अधिकारी चित्रा ननावरे म्हणाल्या, मतदार यादीत नावे नाहीत, नवीन नाव नोंदणी करायची असेल याबाबत जनजागृती करण्यात आली होती.

हेही वाचा

Back to top button