सातारा : फ्रंटलाईन वर्कर्स लसीकरणात बॅकफुटवर | पुढारी

सातारा : फ्रंटलाईन वर्कर्स लसीकरणात बॅकफुटवर

कराड (सातारा) : अशोक मोहने
कोरोना महामारीत लसीकरणाला अनन्य साधारण महत्व आले.लसीसाठी पहाटेपासून रांगेत उभा राहूनही लस मिळत नव्हती. पण कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आणि त्या पाठोपाठ लस घेण्याकडेही लोकांचे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे कोरोनातील फ्रंट लाईन वर्कर्स मात्र लस घेण्यात बॅकफुटर आहेत. आरोग्य विभाग, शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी, शिक्षक यांनी बुस्टर डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण साठ टक्क्यांहून अधिक आहे.

आरोग्य विभागात काम करणारे शासकीय व खासगी रूग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आशा सेविका यांची संख्या कराड तालुक्यात 9 हजार 844 एवढी आहे. यातील 9 हजार 837 जणांनी कोरोनाची पहिली मात्रा घेतली. 8 हजार 796 जणांनी पहिली व दुसरी मात्रा घेतली. मात्र यातील केवळ 3 हजार 6 डॉक्टर्स व आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचार्‍यांनी केवळ तिसरी मात्रा म्हणजे बुस्टर डोस घेतला आहे. याचा अर्थ निम्याहून अधिक डॉक्टर्स व आरोग्य कर्मचार्‍यांनी बुस्टर डोस अद्याप घेतलेला नाही.

कोरोनाची लस घ्या म्हणून जनजागृती करण्यात व लसीकरण करण्यात आघाडीवर असणार्‍या या मंडळींनी मात्र कोरोनाचा बुस्टर डोस घेतला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याहून बिकट परिस्थिती तहसील कार्यालय, पंचायत समिती मधील अधिकारी, कर्मचारी, पोलिस प्रशासन, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनिस हे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणार्‍या मंडळींची आहे. त्यांची एकूण आकडेवारी 8 हजार 605 एवढी आहे. यातील 8 हजार 742 जणांनी कोरोनाची पहिली मात्रा घेतली. 8 हजार 425 जणांनी पहिली व दुसरी या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तिसरी मात्रा बुस्टर डोस केवळ 2 हजार 462 जणांनी घेतला आहे. म्हणजे केवळ तीस टक्के फ्रंड लाईन वर्कर्स यांनी बुस्टर डोस घेतल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

बुस्टरडोस सरसकट मोफत नसल्याने व आता कुठे आहे कोरोना, या समजातून काहींनी बुस्टर डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर काहींनी बुस्टर डोस घेतल्यावर कोरोना होतोय असा गैरसमजातून डोस घेतलेला नाही. आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीतून ही कारणे प्रामुख्याने समोर आली आहेत. जी मंडळी लसीकरणाबाबत जनजागृती करत आहे. लसीचे महत्व सामान्य जनतेला पटवून देत आहे, हिच मंडळी मात्र स्वतः कोरोनाची तिसरी मात्रा घेण्यात मागच्या काट्यावर असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने याबाबत पाठपुरावा सुरू केला असून तिसरी मात्रा सक्तची नसली तरी ती घेणे गरजेचे असल्याचे ते सांगत आहेत.

बुस्टर डोस मोफत तरीही …

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय या ठिकाणी केवळ शासकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, वय वर्ष 60 व त्यावरील आणि सहविकृती (मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, उच्च हृदयरोग, मूत्रपिंड विकार व इतर) या नागरिकांना बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. तरीही हा डोस घेण्यात त्यांच्यामध्ये उदासिनता दिसते. अन्य नागरिकांना खासगी रूग्णालयात बुस्टर डोसची सोय करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना 225 रूपये मोजावे लागत आहेत.

आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणाबाबत जागृती करण्यात येत आहे. फ्रंटलाईन वर्कर्स यांनी बुस्टर डोस घेण्यात उदासिनता दाखवली आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र आरोग्य विभाग त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करण्याचे काम करत आहे. लसीच्या आवश्यक मात्र उपलब्ध आहेत.
– डॉ. सुनील कोरबू

Back to top button