Nashik News | बेशिस्त चालकांना दणका, पंधरा महिन्यांत ६८ कोटींचा दंड | पुढारी

Nashik News | बेशिस्त चालकांना दणका, पंधरा महिन्यांत ६८ कोटींचा दंड

नाशिक : गौरव अहिरे

शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी, यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याअंतर्गत वाहतूक शाखेने १ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२४ या पंधरा महिन्यांच्या कालावधीत बेशिस्त चालकांना ६८ कोटी दोन लाख ३१ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या तर निर्माण होतेच शिवाय, अपघातांनाही निमंत्रण मिळते. गेल्या पंधरा महिन्यांत शहरात सहाशेहून अधिक अपघातांची नोंद झाली आहे. त्यात सुमारे २१० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करणे व त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवले जातात. त्यानुसार शहरात गत पंधरा महिन्यांत सुमारे तीन लाख बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांना ६८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दंड वसुलीकडे लक्ष

शहरात बेशिस्त चालकांवर ई चलन मार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार जानेवारी २०२३ ते मार्च २०१५ या कालावधीत ४६ हजार २०९ चालकांकडून तीन कोटी ८६ लाख एक हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर याच कालावधीत दोन लाख ५६ हजार ९६३ चालकांकडील १८ कोटी ५२ लाख ४६ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करणे प्रलंबित आहे. त्यासाठी वाहतूक शाखेतर्फे संबंधित चालकांना नोटीस पाठवली जात असून लोक अदालतीतही या प्रकरणांचा निपटारा केला जातो.

‘इंटरसेप्टर’मार्फतही कारवाई

शहरातील भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या ताफ्यात इंटरसेप्टर समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार वेगमर्यादा ओलांडून वाहने चालवणाऱ्या ३६ हजार ८२७ चालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यानुसार भरधाव वाहने चालवणाऱ्या चालकांना सात कोटी ३४ हजार ३९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वाहतूक विभागाने केलेली कारवाई

नियम —- कारवाई

हेल्मेट नसणे —- १,२३,९९५

सिटबेल्ट नसणे —- १९,६४५

ट्रिपल सीट दुचाकी —- ७,५३७

नो पार्किंग —- २८,५५४

काळी काच —- २,२१८

नो एन्ट्री —- २२,५६९

सिग्नल तोडणे —- ५५,८११

मोबाइलचा वापर —- १,०७३

झेब्रा क्रॉसिंग —- ७३९

इतर —- २१,९५५

एकूण केसेस —- २,८५,५०४

एकूण दंड —- ६८,०२,३१,३५०

हेही वाचा –

Back to top button