कराड : कृष्णा पुलाचे काम आणखी किती रेंगाळणार | पुढारी

कराड : कृष्णा पुलाचे काम आणखी किती रेंगाळणार

कराड : पुढारी वृत्तसेवा
येथील नवीन कृष्णा पुलाचे चार वर्षांपासून रेंगाळलेले काम.. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सुरू असणारे हाल… वाहतूक कोंडी अशा समस्येचा गर्तेत कृष्णा पूल अडकला आहे. तीन वेळा मुदतवाढ देवूनही संबंधित ठेकेदार कंपनीकडून पुलाचे काम अद्याप कासवगतीने सुरू असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. अजून किती वर्षे काम रेंगाळत राहणार, अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

कराड येथील नवीन कृष्णा पुलाचे काम 2018 मध्ये सुरू झाले. राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत या पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुढील दीड वर्षात पूल पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, 2022 उजाडून चार महिने झाले तरी अद्याप हा पूल वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. पुलासह जोडरस्त्यांची कामेही वर्षानुवर्षे रेंगाळल्याने वाहनधारकांचे हाल मात्र सुरू आहेत. सुरुवातीपासून नवीन कृष्णा पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. कोरोना काळात तर अनेक महिने काम बंद होते. कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे हे काम रेंगाळले आहे.

नवीन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. जोडस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. ही कामे संथ गतीने सुरू असल्याने पुलावर सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. वाहनधारक व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील पावसाळ्यात या पुलावरील वाहतूक सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, जोड रस्त्यांची कामे मुदतीत पूर्ण झाली नाहीत. या कामासाठी सातत्याने मुदत वाढवून देण्यात आली तरी पूल चार वर्षांनंतरही वाहतुकीसाठी खुला होवू शकलेला नाही. एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सकाळी व संध्याकाळी पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी या रस्त्याने ये-जा करत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाला याचे काही देणे घेणे नाही असे वाटते. पुलाच्या जोडरस्त्यांची कामे मार्गी लावून पूल वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी होवू लागली आहे.

चार वर्षांपासून कृष्णा पुलाचे काम रेंगाळले आहे. काम कासवगतीने सुरू असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला होवू शकलेला नाही. एका पुलासाठी हा कालावधी खूपच आहे. कामे अपूर्ण असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.
– सुनील जाधव
सैदापूर

Back to top button