सातारा : जिल्ह्यातील 9 वीज उपकेंद्रात लोडशेडींग | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 9 वीज उपकेंद्रात लोडशेडींग

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वीज निर्मितीसाठी लागणार्‍या कोळशाचा तुटवडा असल्याने राज्यावर वीज भारनियमनाचे संकट तीव्र बनले आहे. सातारा जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले असून सुमारे 202 पैकी 9 उपकेंद्रांत लोडशेडींग लागू करण्यात आले आहे. या उपकेंद्रातील गावे, वाड्या-वस्त्यांवरील बत्ती गुल होत आहे. यामध्ये वडूज, फलटण, दहिवडी, मल्हारपेठ या भागातील काही गावांचा समावेश आहे.

गेल्या दोन वर्षांनंतर कोरोना संकटातून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असतानाच महागाईच्या संकटाने डोके वर काढले आहे. अशातच वीजसंकटही तीव्र बनू लागले आहे. कोळशाअभावी वीजनिर्मिती घटू लागली असल्याने वीजटंचाई तीव्र होत आहे. अशा स्थितीत कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्पांमध्ये वीजनिर्मिती वाढवणे अत्यावश्यक बनले आहे. वीज तुटवड्याचा फटका सर्वांना बसणार आहे. सध्या उन्हाळा तीव्र असल्याने फॅन, कुलर, एसी, फ्रिज आदी साधनांचा वापर प्रचंड वाढला आहे. तीव्र उन्हाळ्यापासून दिलासा मिळण्यासाठी या साधनांचा वापर करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवाय, औद्योगिक, व्यावसायिक, इतर प्रकारातील वीज वापरही वाढला आहे. वीज कंपनीने वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी आराखडा निश्चित केला आहे.

त्यासाठी ‘ए’ ते ‘जी’ पर्यंत श्रेणी तयार केल्या आहेत. वीजबिल न भरणे, थकवणे, गळती जास्त असणे, चोरी होणे आदी बाबींवर या श्रेणी निश्चित केल्या आहेत. वरील बाबींचा सर्वाधिक समावेश असलेली उपकेंद्रे ‘जी 3’ मध्ये असतात. त्याखालोखाल ‘जी 2’, त्या खालोखाल ‘जी 1’ श्रेणीत असतात. सध्या या श्रेणींमध्ये वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील जी 3 मध्ये 6 उपकेंद्रे, जी 2 मध्ये 1 उपकेंद्र व जी 1 मध्ये 2 उपकेंद्रे असून त्यांच्या अखत्यारित असलेल्या गावे, वाड्यावस्त्यांमध्ये वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. यामध्ये कराड तालुक्यातील मलकापूर, माण तालुक्यातील वडूज, दहिवडी व फलटण तालुक्यातील फिडरचा समावेश आहे. वीजेचा तुटवडा वाढल्यास पुढे ‘एफ’ व ‘ई’मधील उपकेंद्रात वीजपुरवठा खंडीत केला जाईल. यामध्ये अनुक्रमे 8 व 11 उपकेंद्रांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात वेळेत वीजबिले भरण्याचे प्रमाण चांगले असून चोरीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ‘ए’ वर्गात 60, ‘बी’ वर्गात 43, ‘सी’ वर्गात 47, ‘डी’ वर्गात 24 उपकेंद्रांचा समावेश आहे. सध्या तरी सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागाला भारनियमनाअभावी दिलासा मिळत आहे.

वीजेची मागणी व पुरवठ्यात तूट…

वीजेची मागणी व पुरवठा यात तूट असल्याने सध्या वीज व्यवस्थापन (भारनियमन) केले जात आहे. कोळशाच्या संकटामुळे वीजनिर्मिती वाढवणे सध्या विद्युत कंपन्यांना अडचणीचे बनले आहे. परिणामी, वीज पुरवठा खंडीत करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा स्थितीत वीजेच्या वापरात बचत केल्यास हीच वीज इतरांना वापरता येणार आहे. त्याद्वारे विजेची तूट कमी करता येणार आहे.

Back to top button