सातारा : एसीबीचा महिलेवर ‘ट्रॅप’ | पुढारी

सातारा : एसीबीचा महिलेवर ‘ट्रॅप’

सातारा : पुढारी वृत्तसेवा
कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील शासकीय वसतिगृहाच्या महिला असलेल्या गृहपालाला 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले. होळीच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर कराडमध्ये खळबळ उडाली.

रत्नमाला रामदास जाधव (वय 52, सध्या रा. कराड, मूळ रा. शाहूनगर जि. बीड) असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उत्तर पार्ले येथे बीसी-ओबीसी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी संशयित आरोपी महिला या गृहपाल आहेत. सासूबाईच्या मृत्यूनंतरची सेवानिवृत्ती पेन्शन सासर्‍यांना मिळावी, यासाठी तक्रारदार महिला रत्नमाला जाधव यांना भेटल्या. संबंधित काम होईल; मात्र त्यासाठी गृहपाल यांनी तक्रारदार महिलेकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार महिलेने सातारा एसीबी विभागात तक्रार दिली. त्यानुसार दि. 17 मार्च रोजी 15 हजार रुपयांवर सेटलमेंट झाले. लाचेची रक्‍कम गुरुवारी स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीविभागाने ट्रॅप लावला.

पैसे स्वीकारताच एसीबी टीमने त्यांना रंगेहात पकडले. कराड परिसरात एसीबीचा महिलेवर ट्रॅप झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली. एसीबीने घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय नोकराने तसेच लोकप्रतिनिधींनी लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button