सातारा : सावकारीप्रकरणी संशयितांना कोठडी | पुढारी

सातारा : सावकारीप्रकरणी संशयितांना कोठडी

कराड,पुढारी वृत्‍तसेवा :  खासगी सावकारी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. युवकाला ट्रक घेण्यासाठी दिलेल्या पैशांची परतफेड न झाल्याने त्याचा ट्रक ओढून नेत त्याची शेत जमीन नावावर करून घेतली व मानसिक त्रास दिला. याप्रकरणी संशयितांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव कारंडे, सुरेश बुधे, अनिल खरात, सागर चव्हाण (सर्व रा. कोपर्डे हवेली) व रामचंद्र पिसाळ (रा. घोणशी) अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. तर याप्रकरणी सचिन गरवारे (रा. उत्तर पार्ले, ता. कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिलीआहे. याबाबत

पोलिसांनी सांगितले की, सचिन गरवारे यांने संशयितांकडून ट्रक घेण्यासाठी व इतर कारणांसाठी व्याजाने पैसे घेतले होते. परंतु व्याजाने घेतलेल्या पैशांची वेळेत परतफेड न झाल्याने संशयितांनी गरवारे याला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या जवळील एटीएम चेक बुक काढून घेतले व दमदाटी करून शेत जमिनीचा दस्त करून घेतला.

या सगळ्या त्रासाला कंटाळून गरवारे यांनी काही दिवसांपूर्वी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी संशयितांना खाजगी सावकारी प्रकरणी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे करत आहेत.

Back to top button